कोल्हापूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल साडे नऊतास चौकशी झाली. यावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांनी भाजपवर टीका केलीये. दोन अडीच वर्षात विरोधकांना टार्गेट करून त्रास दिला जातोय. माझ्यावर सुद्धा कारवाई झाली. पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. विरोधकांना त्रास मात्र दिला जातोय, असं अनिल देशमुख म्हणालेत.
गेल्या 50-60 वर्षात कधीही झालं नाही. इतक्या खालच्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नाही. आता वातावरण बिघडलं आहे. विरोधकांना त्रास देण्याचं फक्त महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या राज्यात सुद्धा सुरू आहे. राष्ट्रवादीला ठरवून टार्गेट केल जातं आहे, असं ते म्हणालेत.
तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असलेला भाजपचा एक सुद्धा नेता महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा सापडणार नाही. फक्त विरोधकांना त्रास द्यायचं सुरू आहे. राजकीय दबाव आणायचा असं षडयंत्र सुरू आहे, असं अनिल देशमुख म्हणालेत.
निवडणुका जवळ आल्या आहेत. अशात युती आणि महाविकास राजकीय पक्षांच्या जागा वाटपाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. यावरही अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या परिस्थितीत आमचे जास्त आमदार-खासदार आहेत. मोठे भाऊ-छोटे भाऊ असले तरी सर्वांचा एकमेकांशी प्रेमाचा व्यवहार आहे. त्यात शंका घ्यायचं कारण नाही. याचा जागा वाटपावर परिणाम होणार नाही, असं ते म्हणालेत.
आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण आहे. प्रत्येक राजकीय पक्ष प्रयत्न करतो. तसं त्यांचं चालू असतील. ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते पाहता भारतीय जनता पार्टीने कितीही प्रयत्न केले तरी फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या तिन्ही जागा ते हरले आहेत. त्यामुळे भाजपचा पराजय अटळ आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, असंही अनिल देशमुख म्हणालेत.