कोल्हापूर | 17 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सगळेच पक्ष तयारीला लागलेत. अशात भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. ‘INDIA’ असं या आघाडीचं नाव आहे. या आघाडीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष आहेत. या आघाडीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सामील व्हावं असं राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. पण याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण आंबडेकर इंडियासोबत आले तर त्यांचा आघाडीला फायदा होईल, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
काही दिवसांआधीच प्रकाश आंबेडकर यांनी मविआबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्हाला महाविकास आघाडीसोबत काही देणंघेणं नाही. महाविकास आघाडीसोबत आमचा काही संबंध नाही. आमची युती केवळ ठाकरे गटासोबत आहे. पण आपला महाविकास आघाडीशी संबंध नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांआधी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांना साद घातली आहे. पण याला ते प्रतिसाद देणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपच्या राजकीय भूमिकेवर टीका केली आहे. तोडफोड करून उमेदवार देतात. घराणेशाही नाही असं म्हणतात. आमच्याकडे निवडून येणाऱ्याला उमेदवारी देणार आहोत. राज्यात भाजपने किती तोडफोड केली आहे. आमच्या नव्या आघाडीचा भाजपने धसका घेतला आहेय. तुमच्यासोबतच्या 40 लोकांचा आधी काय तो निर्णय घ्या. जर तुमच्याकडे बहुमत आहे तर इतर पक्षातील नेत्यांची गरज का भासते?, असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापूर लोकसभेची जागाही काँग्रेसला मिळावी, अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूरची लोकसभेची जागा काँग्रेसने लढावी ही माझी इच्छा आहे. कारण याठिकाणी आम्हाला चांगलं वातावरण आहे. खूप वर्षांपासून इथं काँग्रेसला चांगलं वातावरण आहे. आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असं ते म्हणालेत.
राज्यात शिक्षकांच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. डॉक्टर नाही, अनेक विभागात कर्मचारी नाही पण हे सरकार रिक्त जागा भरत नाही.हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. या सरकारला लोकसभा आणि विधानसभा यावर परिणाम होईल अशी भीती सरकारला आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.