कोल्हापूर | 07 ऑक्टोबर 2023, भूषण पाटील : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांआधी राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादीतील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर पुढे काहीच दिवसाच अजित पवार भाजपसोबत गेले. पण ज्या अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनाच सोबत का घेतलं? असा सवाल अवघा महाराष्ट्र विचारतो आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना सोबत घेण्याचं कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलंय.
नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सध्या जगात आपली छाप पाडतं आहे. अशात त्यांचं नेतृत्व सगळेच मान्य केलं आहे. अजित पवार आमच्यासोबत आले. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं. त्यांनी तसं जाहीर केलं. त्यांचं ते जाहीर सांगणं महत्वाचं आहे. बाकी चौकशा, कारवाया ज्या आधी झाल्या त्या होत राहतील. पण आज त्यांनी नरेंद्र मोदी यांना त्यांनी समर्थन दिलं ते महत्वाचं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात लोकसभा प्रवास उपक्रम सुरू केला आहे. लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी आमचा उपक्रम आहे. ‘संपर्क ते समर्थन’ असा आमचा प्रवास आहे. जनता आम्हाला समर्थन देत आहे. याचं समाधान आहे. निवडणूक जवळ येईल तसं आम्हाला आणखी समर्थन मिळेल आणि आमचा विजय होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
1 हजार लोकांना भेटल्यानंतर दोन ते तीन लोक इंडिया आघाडीला मत देऊ म्हणतात. सोशल मीडियावर जाणीवपूर्वक भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण चुकीच्या पद्धतीने तयार केलेलं ग्राफिक्स लोकांना समजत, त्यामुळं त्याची फारशी चिंता नाही. जनतेला खरं काय आणि खोटं काय आहे हे लोकांना कळतं. एका लोकसभेत व्हाट्सएपचे 1200 ग्रुप तयार करून जनतेपर्यंत जाणार आहोत, असंही बावनकुळे म्हणालेत.
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या नेत्यांना वाटतं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत. आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितलं की, पुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. तर आम्हाला काम करावं लागेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटलं.