कोल्हापूर : रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं जातंय. या आंदोलन स्थळावरील पोलिसांवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आंदोलन महिलांच्या गळ्यातील डूल काढून घेतले. मारहाण आणि अत्याचाराचे व्हीडिओ माझ्याकडे आहेत, असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. कायदा सुव्यवस्था राखायला गेला होता की चोऱ्या करायला गेला होत्या?,असा सवाल राजू शेट्टी यांनी पोलिसांना विचारला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्ह्यात यायला बंदी घालण्यात आली आहे. बारसू प्रकल्पाबाबत सोशल मीडियात पोस्ट अथवा फोटो शेअर करायलाही मज्जाव करण्यात आला आहे.
रत्नागिरीतील पोलीस अधिकाऱ्यांनी शिरोळमधल्या राहत्या घरी मध्यरात्री राजू शेट्टी यांना नोटीस बजावली आहे.
बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने नोटीस काढली आहे. अशा नोटिसीला मी भीक घालत नाही. मी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
मला आलेली नोटीस बेकायदेशीर आहे. हा तर कहरच झाला आहे. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी सुद्धा इतकी बंधन घातली नव्हती. इंग्रजांनी अटक केली मात्र लोक तुरुंगातून पत्र लिहू शकत होते. अशी कागदी नोटीस मला बंधन घालू शकत नाहीत. कोणाच्या सांगण्यावरून सरकार ही दडपशाही करत आहे?, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
एखाद्या अतिरेक्याला नक्षलवाद्याला जशी वागणूक द्यावी तशी वागणूक मला पोलिसांनी दिली, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.
सरकार जशी कोणाची तरी सुपारी घेऊन आंदोलन चिरडायचा प्रयत्न करतंय. आंदोलक महिलांच्या कानातील डूल पोलिसांनी काढून घेतलं. तसे व्हीडिओ माझ्याकडे आहेत. तुम्ही कायदा सुव्यस्था राखायला गेला होता की चोऱ्या करायला गेला होता?, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
जनरल डायर सुद्धा इतक्या दृष्टपणे वागला होता की नाही माहित नाही. पण या सरकारची तुलना डायरशीच होऊ शकते. सौदी अरेबियाच्या कंपनीसाठी आणि गुजरातमधील लोकांसाठी महाराष्ट्र सरकार ईर्ष्येला पेटलं आहे. मला तिथला एक स्थानिक दाखवा, जो जमीन घ्या अन् रिफायनरी करा म्हणतोय असा. त्यामुळे हे सरकार अन्याय करणारं आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.
माझ्या मदतीची ज्यावेळी त्यांना गरज असेल त्यावेळी बारसूला जाईल. सगळी बंधन झुकारून जाईल, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.