कोल्हापूर | 23 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार ‘साहेबांचा संदेश’ या कार्यक्रमाअंतर्गत राज्यव्यापी दौरा करत आहेत. आज ते कोल्हापुरात आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियमजवळ असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना कशी संधी दिली, यावर भाष्य केलं. तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
1998 मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी देवू नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण शरद पवार यांनी हा विरोध डावलून हसन मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत. तशा तक्रारी आमच्याकडे आधी देखील आल्या होत्या. आता देखील येत आहेत. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अशा वातावरणात नवीन कंपन्या आपल्या जिल्ह्यात येत नाहीत. त्यामुळे तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही, असं रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची उद्या कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात संध्याकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहेत. दसरा चौक मैदानात या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. दसरा चौकात ‘बाप बापच असतो’ आणि ‘योद्धा पुन्हा मैदानात’ असे फलक लागले आहेत. या सभेनंतर शनिवारी शरद कोल्हापूरात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या सभेत आणि पत्रकार परिषदेत पवार काय बोलतात? याकडे कोल्हापूरकरांसह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्याआधी आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुश्रीफांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार साहेबांची स्वाभिमान सभा उद्या दसरा चौकात होणार आहे. कोल्हापूर आणि पवारसाहेबांचं वेगळं नातं आहे. त्यांचं रक्ताचं नातं आहे. दसरा चौकात सभा घेण्याचं खास कारण आहे. कारण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराने काम करतो. तो विचार या पवित्र ठिकाणाहून देण्याचा प्रयत्न आहे. सभेला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व नागरिक स्वतःच्या गाडीने, खर्चाने या सभेला उपस्थित राहणार आहेत, असं रोहित पवार म्हणाले.
आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार कधीही भाजपच्या बाजूने गेले नाहीत. इतकंच नाही तर पवारसाहेब कधीही दिल्लीसमोर झुकले नाहीत, असंही रोहित पवार म्हणाले.