कोल्हापूर | 22 जुलै 2023 : राष्ट्रवादीतील अजित पवार गट युती सरकारमध्ये सामील झाला. अशात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील काँग्रेसच्या नेत्यांना ऑफर दिली असल्याची चर्चा आहे. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सतेज पाटील यांनी उघड भाष्य केलंय. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही काँग्रेस एकसंध आहे. जनतेच्या मनामध्ये विश्वासाचं वातावरण केवळ काँग्रेस देऊ शकतो. भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधी यांनी सामान्यांचा आवाज उठवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कुणी कुठेही जाणार नाही. आम्ही राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढणार आहे. महायुती सोबत जाण्याचा कोणताही प्रश्न नाही, असं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या ऑफरवर आमदार सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अधिवेशनात काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत असं सरकारने ठरवलं आहे. शेतकरी अनुदान, शिक्षक भरती रायगड मधील घटना यावर सरकार बोलत नाही. विरोधी बाकावरील आमदारांना सरकार निधी देत नाही. हे मंत्री राज्याचे नेतृत्व करतात की मतदारसंघाचे हा प्रश्न पडतो. 100% झुकतं माप सत्ताधारी आमदारांना देणं हे चूक आहे, असं सतेज पाटील म्हणालेत.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. अधिवेशनामध्ये असेल किंवा भविष्य काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र राहू, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचा मुख्यमंत्री मुंबईत ठरत नाही तर तो दिल्लीत ठरत असतो हे आता कळालं असेलच, असा टोला त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. भाजपला कर्नाटकमध्ये तीन महिने झाले तरी विरोधी पक्षनेता देता आलं नाही. मात्र इकडे आम्ही तसं करणार नाही लवकरच काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून देण्यात येईल. वर्षापूर्वी बसलेले जॅकेट आता बसणार का हे आम्ही आमच्या मित्रांना विचारतो. मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटत नाही त्यामुळे हा निर्णय लवकर होईल असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.
कोल्हापूर महानगरपालिकेला गेले दोन महिने आयुक्त नाही. भाजपने दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव घ्यायचं की शिवसेनेने दिलेल्या अधिकाऱ्याचं नाव घ्यायचं हा वाद आहे. मात्र यांच्या वादामध्ये कोल्हापूर शहराचं प्रचंड नुकसान होत आहे, असं म्हणत सतेज पाटील यांनी निशाणा साधला आहे.