कोल्हापूर | 17 ऑक्टोबर 2023 : स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आक्रमक झाली आहे. आज आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शिरोळमधून आत्मक्लेश यात्रा काढण्यात आली आहे. ही आत्मक्लेश यात्रा कोल्हापूर सांगली या भागात जाणार आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा त्यांनी सरकारवर टीका केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी सल्लाही दिला आहे. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालतं. मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवार यांच्या हातात द्यावीत. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत.
ऊसाच्या हप्त्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज पदयात्रा काढण्यात येत आहे. शिरोळ दत्त साखर कारखान्यापासून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. ऊसाचा मागच्या वर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा, यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही. तर यंदाचा ऊस गळीत हंगामा सुरू करून देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. कारखान्यात वजन काटे डिजिटल करावेत, अशीही मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आक्रोश पद यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.
राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात आजपासून ऊसाच्या उर्वरीत हफ्त्यासाठी पदयात्रा सुरू होत आहे. या यात्रेआधी आमदार बच्चू कडू यांनी राजु शेट्टी यांची भेट घेतली. बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांच्या या पद यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी आसूड त्यांनी शेट्टी यांना भेट दिला. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ही पदयात्रा तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या दोघांमध्ये चर्चा झाली.
शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब यांची उद्यापासून ५५० किमी उसाच्या उर्वरीत हफ्त्यासाठी पदयात्रा सुरू होत आहे. आज सातारा येथे दिव्यांग कल्याण अभियानासाठी असल्यामुळे सांगली येथे राजु शेट्टी यांची भेट घेतली व पदयात्रेसाठी आसुड देऊन शुभेच्छा दिल्या… pic.twitter.com/XyNNvWnMdz
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) October 17, 2023
काही दिवसांआधी राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांना सरकारमधून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. सध्याच्या सरकारमध्ये, सत्तेत काहीही उरलेलं नाही. सरकारमधून बाहेर पडा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लढा देऊ. शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं होतं. त्यांनंतर बच्चू कडू यांनी काल राजू शेट्टींची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे.