94 टक्के पडूनही आत्महत्या, देवकर कुटुंबीयांच्या घरी गेलेल्या संभाजीराजेंना अश्रू अनावर

| Updated on: Jun 24, 2019 | 7:17 PM

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी देवकर कुटुंबाला भेट देत त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी संभाजीराजेंना अश्रू अनावर झाल्याने ते भावूक झाले.

94 टक्के पडूनही आत्महत्या, देवकर कुटुंबीयांच्या घरी गेलेल्या संभाजीराजेंना अश्रू अनावर
Follow us on

उस्मानाबाद : जिल्ह्यातील देवळाली येथील अक्षय शहाजी देवकर या दहावीत शिकणाऱ्या मुलाने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अकरावीमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या आईवडीलांनी केला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी आज (24 जून) देवकर कुटुंबाला भेट देत त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी संभाजीराजेंना अश्रू अनावर झाल्याने ते भावूक झाले. देवधर कुटुंबाची गरीब परिस्थिती पाहिल्यावर त्यांचे सांत्वन कोण करणार? अशी काळजी त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती घराण्याने शिकवले आहे की, डोळ्यात अश्रू येता कामा नये. मात्र मी पण माणूस आहे. देवकर कुटुंबाची परिस्थिती पाहिली पाहिल्यावर मी भावूक झालो. गरीब परिस्थितीतून 94 टक्के गुण मिळवलेल्या मुलाने आत्महत्या केल्यावर त्या कुटुंबाचे सांत्वन कोण करणार या काळजीतून मी भावूक झालो. असे मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं.

“छत्रपती संभाजीराजेंनी आमच्या घरी येत आमच्या कुटुंबाची क्षमा मागितली. तसेच सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करावी,” अशी इच्छाही अक्षयची आई निर्मला देवकर यांनी व्यक्त केली.

देवळाली येथील आत्महत्याच्या घटनेनंतर “आरक्षण गेलं खड्ड्यात!, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करा,” असा संताप खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला होता. “गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न. त्यातच आरक्षणाअभावी मराठा विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येनंतर खासदार, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला. आरक्षण गेलं खड्ड्यात ! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,” अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून केली. ‘मी मनापासून थक्क झालो आहे, माझ्याकडे बोलण्यासारखे शब्दच नाहीत, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले होते.

अक्षय हा गरीब कुटुंबातील होता. त्याच्या आईने त्याला गरिबीतून शिकवले. मराठा समाजात जन्म झाला ते चुकलो  असे तो नेहमी सांगायचा. राजश्री शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले होते ज्यात मराठा समाजाचाही समावेश होता. असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षण अद्याप कोर्टात प्रलंबित

गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी करुन मोर्चे काढूनही मराठ्यांच्या पदरी काही आरक्षण पडलेलं नाही. फडणवीस सरकारनं गेल्या पाच वर्षात हा प्रश्न मार्गी लावलेला नाही. आरक्षणाची मागणी करत आतापर्यंत 40 हून अधिक तरुणांनी आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान आताही सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण कोर्टात प्रलंबित आहे अशी खंतही संभाजीराजेंनी बोलून दाखवली.

देवळाली येथील आत्महत्याच्या घटनेनंतर आरक्षण गेलं खड्ड्यात!, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करा, असे वक्तव्य मी केले होते. मी आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र माझ्या आजोबांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मात्र शाहू महाराजांनी जे आरक्षण अपेक्षित होतं ते आपण देतोय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाऊ नका

सरकारने पूर्ण बहुजन समाजाच्या लोकांना आरक्षण द्यावे. तसेच आरक्षणाच्या विरोधात कोणत्याही समाजाने कोर्टात जाऊ नये अशी विनंतीही संभाजीराजेंनी इतर समाजांना केली.

त्याशिवाय त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व मोफत देण्याची मागणी केली होती. मोफत शिक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत. हे थांबवायचे असेल तर मोफत शिक्षण हाच पर्याय आहे. असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. तसेच आरक्षणाबरोबरच सक्तीच्या शिक्षणाची गरज आहे . खाजगी संस्था चालक विद्यार्थ्यांची लूट करतात त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी होत चालेल आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच येत्या काही दिवसात मी मोफत शिक्षणाबाबत संसदेत आवाज उठवणार आहे. याबाबत लवकरच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही संभाजीराजेंनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय ?

उस्मानाबादच्या देवळाली गावातील मराठा समाजातला तरुण अक्षय शहाजी देवकर यानं आत्महत्या केली. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. अक्षयला गणितात 99 मार्क्स होते. त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. मात्र दुष्काळ, घरची गरिबी आणि आरक्षण मिळत नसल्यानं प्रवेशात निर्माण झालेल्या अडचणी या तणावातून त्यानं आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत ही आक्रमक भूमिका घेतली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

आरक्षण गेलं खड्ड्यात, आपल्या ‘व्यवस्थेतच’ मोठा दोष : संभाजीराजे