भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 21 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ते शरद पवारांच्या बारामतीकडे… कारण अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. यंदा बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. तशा हालचालीही सुरु आहेत. अशातच या सगळ्यावर कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाष्य केलंय. बारामती मधील लढतीबद्दल मला माहित नाही. बारामतीमधला उमेदवार अजून विरोधकांनी जाहीर केलेला नाही, असं शरद पवार म्हणाले.
मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. काँग्रेस आम्ही एकत्रच काम करतो. याचा अर्थ विलीनीकरण हा काही होणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
काही दिवसांआधी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ असल्याचं शरद पवार म्हणाले. आमदार सोडून जाणं हे मला चिंता करण्यासारखी गोष्ट वाटत नाही. ए आर अंतुले मुख्यमंत्री असतानाही असंच झालं होतं. मी परदेशात असताना 59 पैकी 5 सोडून सर्व आमदार सोडून गेले होते. पण नंतरच्या निवडणुकीत 95 टक्के आमदार पराभूत झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की, असं शरद पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर कसा करतात, हे चंडीगडमध्ये पाहायला मिळालं. यावरून सत्तेचा वापर कसा करतात हे दिसलं. पक्षाची स्थापना मी केली. आमच्याकडून पक्ष काढून दुसऱ्यांना दिलं. आमचं चिन्ह काढून दुसऱ्यांना देण्यात आलं. पण आमचा अजून न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पक्षांत्तर बंदी कायद्याबाबत सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं पवार म्हणाले.