कोल्हापूर | 26 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष फुटीवर भाष्य केलं आहे. आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे!, असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. आमच्यातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला, ही वस्तूस्थिती आहे. पण या लोकांना राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारला असता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळे काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पण हे लोक म्हणजे पक्ष नव्हे, असं शरद पवार यांनी सांगितलं. आता पुन्हा अजित पवार यांच्यावर प्रश्न विचारू नका, असंही पवारांनी बजावलं आहे. कितीही तुरूंगात टाकलं तरी फॅसिस्ट प्रवृत्तीच्या विरोधात लढत राहणार, असा निर्धारही शरद पवार यांनी बोलून दाखवला.
आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात जाऊन आमचे म्हणणे मांडत आहोत. महाविकास आघाडी अर्थात ‘INDIA’ ची बैठक 1 तारखेला मुंबईला होणार आहे. राजकीय 16 पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत एकत्रित प्रचार मोहीम आणि लोकसभा निवडणुकीत एकत्रित राहण्याचा आढाव घेण्यात येणार आहे, असं म्हणत शरद पवार यांनी ‘INDIA’च्या बैठकीची माहिती दिली.
सत्ताधारी पक्षाची ही धोरणं आहेत की, ते पक्ष फोडत आहेत. तुमचा विचार सोडा आणि आमच्यासोबत या, असं धोरण त्यांचं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.
आमच्यातल्या काही लोकांना तुरुंगात जावं लागलं. जे गेले नाहीत, ते हे भाष्य करत आहेत. पक्षातील लोकांची नाव सभेत घेऊन त्यांचे महत्व कशाला वाढवायचं?, असं म्हणत शरद पवारांनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधला आहे.
आम्हाला नवं नेतृत्व गाव गावात तालुका पातळीवर तयार करायचं आहे. लोकांमध्ये जावून पक्षाची भूमिका सांगायची आहे. येत्या काळात जनता या सगळ्या गोष्टींना उत्तरं देईल, असंही ते म्हणाले. चांद्रयान 3 मोहीमेमध्ये शास्त्रज्ञांनी हिंदुस्थानचे प्रतिमा वाढवली आहे. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांच्या कार्याला सलाम!, असं म्हणत शरद पवार यांनी चांद्रयान 3 मोहीमेवर भाष्य केलंय.
बच्चू कडू यांच्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदी काम केल्याचा दाखला दिला. बच्चू कडू कोण असे बोलून आपण त्यांचे महत्व कमी करताय का ? ते 4 वेळा कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता निवडून येत आहेत, असा प्रश्न विचारला असता. ते चार वेळा आमदार असतील पण मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे, असं शरद पवार म्हणाले.