Udhav Thakeray On Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat sing Koshyari) यांनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं. हिंदू म्हणून एकवटलेल्यांमध्ये फूट पाडण्याचं काम केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांनी केला आहे. काल एका कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई (Mumbai)आर्थिक राजधानी नाही, असं वक्तव्य केलं होते. त्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा नुसता समाचारच घेतला नाही तर त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवत त्यांनी महाराष्ट्रातील हिंदूंमध्ये फूट फाडण्याचं नीच काम केल्याची घणाघाती टीका केली. ‘मराठीच नाही तर अमराठी हिंदूंनीही राज्यपालांच्या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त केला. तेही चिडले आहेत. असं कधी झालं नव्हतं आणि असं होता कामा नये, असं लोक म्हणत आहे. कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं.’ असं संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान या वक्तव्याच्या समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस यांच्या भूमिकेवरही सडकून टीका केली. त्यांचे नवनीतीचे हिंदुत्व असून त्याला नुकतेच अंकूर फुटले आहे. या नव्या सरकारची राज्यपालांच्या वक्तव्यावर काय भूमिका आहे असा तिरकस सवाल त्यांनी विचारला. ‘ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे.’ असा जाब त्यांनी राज्यातील नव्या सरकारला विचारला आहे.
राज्यपाल पदाचा कोश्यारी यांना मान नाही, त्यांना आदर नाही. ते सारखं जातीपातीत आणि धर्मात आग लावण्याचे काम करत असल्याचा आरोप ही ठाकरे यांनी लावला. ते मराठी माणसाचा अपमान करत असतील आणि त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय सरकारने घ्यावा अशी हिंदू म्हणून मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दल हिणकस उद्गार काढले याची आठवण करुन देत राज्यपाल कोश्यारी यांचं पार्सल कुठून तरी पाठवल्याची खोचक टीका ही त्यांनी केली.