पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतल्याने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी (Kothrud MLA Medha Kulkarni) यांचं तिकीट कापण्यात आलंय. यानंतर मेधा कुलकर्णी (Kothrud MLA Medha Kulkarni) यांना राष्ट्रवादी आणि मनसेकडून ऑफर आल्याचंही त्यांनी सांगितलं. पण आपण भाजपशी एकनिष्ठ असून पक्षासाठीच काम करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.
चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच, कोथरुडमध्ये जातीय राजकारण रंगलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेनेही मेधा कुलकर्णी यांना संपर्क साधत ऑफर दिल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र, आपण भाजपशी एकनिष्ठ असून नम्रपणे दोघांच्याही ऑफर नाकारल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.
चंद्रकात पाटील यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे, हे माझ्यासाठी भाग्यच आहे. त्यामुळे मतदारसंघाचा जास्त विकास होईल. आपण चंद्रकात पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असून, ब्राह्मण महासंघानेही वेगळी भूमिका घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.
चंद्रकांत पाटलांना ब्राह्मण महासंघाचा विरोध
कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.