Video | प्रत्यक्ष नरेंद्र मोदींचा फोन; तरीही भाजपाविरोधात शड्डू ठोकला, आता डिपॉझिट जप्तीची वेळ…

| Updated on: Dec 08, 2022 | 12:42 PM

भाजपाविरोधात शड्डू ठोकाणारे कृपाल परमार हिमाचल प्रदेश निवडणुकीत चांगलेच चर्चेत आले. ते थेट मोदींशी बोलतायत, असा दावा करणारा व्हिडिओही खूप व्हायरल झाला.

Video | प्रत्यक्ष नरेंद्र मोदींचा फोन; तरीही भाजपाविरोधात शड्डू ठोकला, आता डिपॉझिट जप्तीची वेळ...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिमलाः गुजरात आणि  हिमाचल प्रदेशातील निवडणुकांचे रंजक किस्से समोर येत आहेत. मतमोजणीच्या दिवशी तर भाजपाचे पारंपरिक शत्रू, अपक्ष उमेदवारांच्या (Independent Candidate) कहाण्या आणि आताची स्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याच चर्चेतील हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एक चेहरा म्हणजे कृपाल परमार (Kripal Parmar). भाजपचे बंडखोर आणि निवडणुकीत अपक्ष उमेदवार.

फतेहपूर विधानसभा मतदार संघातून परमार उभे राहिले खरे, पण डिपॉझिट वाचवण्याएवढीही मतं ते मिळवू शकले नाहीत.

हिमाचल विधानसभेसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर परमार यांचा किस्सा खूप व्हायरल झाला होता. या जागेवर भाजपाने मंत्री राकेश पठानिया यांना तिकिट दिलं होतं.

त्यामुळे कृपाल परमार नाराज झाले. त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. अपक्ष उभे राहून भाजपाविरोधात शड्डू ठोकला.

भाजपमध्ये पक्ष श्रेष्ठींचा शब्द प्रमाण असतो. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहसा कुणी टाळत नाही. पण इथे तोसुद्धा चालला नाही, अशी चर्चा आहे.

मोदींचा फोन आल्याचा दावा करणारा हाच तो व्हिडिओ-

कृपाल परमार यांच्यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात केलेल्या दाव्यानुसार, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमार यांना फोन केला होता. निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची विनंती केली होती.

पण कृपाल परमार यांनी मोदींचही ऐकलं नाही. भाजपा उमेदवाराविरोधात निवडणुकीत उतरले. या चर्चेत त्यांनी भाजपच्या अध्यक्षांचीही तक्रार केली होती, असं म्हटलं जातं.

डिपॉझिट जप्तीची वेळ

कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला डिपॉझिट वाचवायचे असेल तर एकूण मतांच्या 16.6 टक्के मतं मिळवावी लागतात.

फतेहपूरमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार काँग्रेस आणि भाजपा उमेदवारात चुरस पहायला मिळतेय. 1 हजार मतांच्या फरकाने दोघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेसचे भवानी सिंग पठानिया हे भाजपाच्या राकेश पठानियांच्या पुढे असल्याचं चित्र आहे.

तर बहुचर्चित बंडखोर कृपाल परमार यांना दोन हजार मतं कशीबशी मिळालेली दिसून येत आहेत. एकूण मतांच्या तुलनेत 6 टक्के मतं. म्हणजेच कृपाल परमार यांना स्वतःचं डिपॉझिटही जप्त करता आलेलं नाही.