‘विनायक राऊतांचा खूप त्रास होता, सभागृहात बोलू देत नव्हते’, खासदार कृपाल तुमानेंचा गंभीर आरोप

| Updated on: Jul 22, 2022 | 4:33 PM

विनायक राऊत आम्हाला सभागृहात बोलू देत नव्हते. मागील एक वर्षापासून राऊतांनी बुधवारची बैठकही घेतली नाही. विनायक राऊतांना गटनेतेपदावरुन हटवण्याचं काम मागील अधिवेशनातच होणार होतं, असा दावाही तुमाने यांनी केलाय.

विनायक राऊतांचा खूप त्रास होता, सभागृहात बोलू देत नव्हते, खासदार कृपाल तुमानेंचा गंभीर आरोप
कृपाल तुमाने, विनायक राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरुन पुन्हा एकदा जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे गटात सहभागी 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेत राहुल शेवाळे यांना गटनेते करण्याची मागणी केली आणि लोकसभा अध्यक्षांनी ती मान्यही केलीय. त्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटही चांगलाच आक्रमक झालाय. अशावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. तुमाने म्हणाले की, विनायक राऊत यांचा भयानक त्रास होता. विनायक राऊत आम्हाला सभागृहात बोलू देत नव्हते. मागील एक वर्षापासून राऊतांनी बुधवारची बैठकही घेतली नाही. विनायक राऊतांना गटनेतेपदावरुन हटवण्याचं काम मागील अधिवेशनातच होणार होतं, असा दावाही तुमाने यांनी केलाय.

आम्ही शिवसेनेचेच आहोत, आम्ही फक्त गटनेता बदलला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही गेल्या वेळी भाजपसोबत निवडणूक लढवली होती. आम्ही सर्व 12 खासदार शिवसेनेतच आहोत. आम्ही नाराज होतो कारण आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत होतो. आमचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळणारे नाहीत. दहशतवाद्यांना मदत करणारे मंत्रिमंडळात होते. मी उद्धव ठाकरे यांना पाच वेळा भेटलो. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, असंही तुमाने यांनी सांगितलं.

‘आमचा 12 चा आकडा 15 होणार’

एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढवायला हवी होती, त्यांना जीवे मारण्याची धमकी होती, असं सांगतानाच आमचा 12 चा आकडा 15 होणार असा दावाही तुमाने यांनी केलाय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. शरद पवार यांनी त्यांना जबदस्तीनं मुख्यमंत्री केलं. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडा इतकीच मागणी होती, असं तुमाने यांनी म्हटलंय.

निलेश राणेंचा विनायक राऊतांवर घणाघात

‘खासदार विनायकरावबद्दल जे काय मागच्या पंधरा दिवसापासून त्यांच्याच पक्षातले सहकारी आमदार खासदार जे काय बोलतात ते ऐकून माझ्यासारख्या माणसाला आश्चर्य वाटलं नाही, कारण मला माहित होतं की हा माणूस तसाच आहे. पण वाईट या गोष्टीचा वाटतं याच्यामुळे कोकणाचे नाव खराब झालं. हा माणूस कोकणातून निवडून जातो, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा खासदार आहे, असा माणूस महाराष्ट्रात बदनाम होणे हे आमच्या मातीसाठी, आमच्या कोकणासाठी ऐकायला बरं वाटत नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर जोरदार टीका केलीय.