वसई : नालासोपारा विधानसभा मतदारसंघात गुरुवारी भगव्या आणि पिवळ्या वादळाची टक्कर होण्याची चिन्हं आहेत. कारण बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur vs Pradeep Sharma) आणि शिवसेनेचे उमेदवार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Kshitij Thakur vs Pradeep Sharma) हे दोघेही उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बविआचा झेंडा पिवळा तर शिवसेनेचा भगवा झेंडा उद्या नालासोपाऱ्यात पाहायला मिळेल.
दोघेही नालासोपारा पूर्वेकडून सकाळी 10 ते 11 या वेळेत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. नालासोपारा पूर्वेकडून रॅली काढून नालासोपारा पश्चिमेकडील निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचणार आहेत.
या दोघांच्या रॅलीच्या मध्यभागी एकच मार्ग आहे. नालासोपारा पुलावरुन दोन्ही रॅली पश्चिमेकडे जाणार आहेत. दोघांची रॅली जर एकाचवेळी नालासोपारा ब्रिजवर आली, तर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांत जोरदार घोषणाबाजी होऊन, भगव्या पिवळ्या वादळाची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामानाही करावा लागणार आहे.
नालासोपारा पूर्व तुलिंज रोडवरील माजी उपमहापौर उमेश नाईक यांच्या बहुजन विकास आघाडी कार्यालया समोरुन, सकाळी 11 वाजता क्षितीज ठाकूर पायी रॅली सुरु करतील.
यावेळी त्यांच्यासोबत वडील आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, आई आणि माजी महापौर प्रविणा ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते असतील.
शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा हे नालासोपारा पूर्व सेन्ट्रल पार्क येथील शिवसेना शाखांपासून रॅली काढणार आहेत. त्यांच्या रॅलीत पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे यांच्यासह नालासोपारा येथील महायुतीचे महत्वाचे पदाधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे.
शर्मा यांची रॅली सकाळी साडेदहा वाजता निघणार असून, टाकीपाडा रोड, आंबेडकर नगर वरुन तुलिंज रोडवरुन, पूर्व-पश्चिम जोडणारा रेल्वे पूल, सिविक सेंटर मार्गे श्रीप्रस्थ येथील निवडणूक कार्यालयापर्यंत जाणार आहे.
क्षितीज ठाकूर यांची रॅली उमेश नाईक यांच्या कार्यालयापासून तुलिंज रोडवरुन रेल्वे ब्रिज, सिविक सेंटर मार्ग श्रीप्रस्थ निवडणूक कार्यालयात जाणार आहे. दोघेही जर 11 ते साडे 11 च्या सुमारास निघाले तर नालासोपारा पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर यांची रॅली एकत्र येण्याची शक्यता आहे.
दोन रॅली एकत्र आल्यावर एकमेकांत जोरदार घोषणाबाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदावरी अर्ज भरण्याच्या दिवशीच भगवं-पिवलं वादळ दिसणार आहे.
सकाळी 11 ते 12 हा वेळ शाळा सुटायचा असतो, उद्या शाळांना सुट्टी नाही, तुलिंज हा मुख्य रस्ता रहदारीचा आणि वाहतूक कोंडीचा आहे. या दोन्ही रॅली मागेपुढे किंवा एकत्र जरी तुलिंज रोडवर आल्या तर वाहनधारक, नागरिक, शाळकरी मुलं, शाळेतील बस यांना या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागणार आहे. या वेळेत पोलिसांचाही कस लागणार आहे.