नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 (Jammu Kashmir Article 370) वर लोकसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान लडाख (Ladakh) मधील भाजप खासदार सेरिंग नामग्याल (Tsering Namgyal) यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणामुळे प्रभावित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरवर सेरिंग यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला. लडाखमधील जनतेवर कायम अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त करत कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्यांना नामग्याल यांनी गप्प केलं.
कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्या खासदारांवर सेरिंग तुफान बरसले. जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारांनी लडाखमधील नागरिकांना नोकरी देताना नेहमीच पक्षपात केला. काँग्रेसने कलम 370 चा गैरवापर करत लडाखमधून बौद्ध संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला. लडाखची जनता केंद्रशासित प्रदेश होण्याच्या बाजूने आहे, अशी भूमिका सेरिंग यांनी मांडली.
कलम 370 चा चुकीचा वापर करत काश्मीरी पंडितांना बाहेर काढण्यात आलं. आतापर्यंत लडाखमध्ये एकही उच्च शिक्षण संस्था नव्हती. मोदी सरकार आल्यानंतर पहिल्यांदा इथे विश्वविद्यापीठ सुरु झालं, असं सेरिंग म्हणाले.
‘कलम 370 च्या आडून लडाखवर अन्याय होत आला. मात्र या विधेयकातून लडाखमधील जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षांचा सन्मान राखण्यात आला.’ असं ते म्हणाले.
आतापर्यंत लडाखच्या विकासासाठी गठित केलेला निधी काश्मीरच्या विकासासाठी वापरण्यात आला. लडाखच्या जनतेसोबत नेहमीच अन्याय झाला. मात्र मोदी सरकारने या क्षेत्राला स्वतःची ओळख दिली, असंही ते म्हणाले.
My young friend, Jamyang Tsering Namgyal who is @MPLadakh delivered an outstanding speech in the Lok Sabha while discussing key bills on J&K. He coherently presents the aspirations of our sisters and brothers from Ladakh. It is a must hear! https://t.co/XN8dGcTwx6
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
सरकारने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान केला होता. काश्मीरला तुम्ही द्वीपक्षीय प्रश्न मानता का नाही, यावर सरकारचं उत्तर काँग्रेसला अपेक्षित होतं.
सेरिंग यांच्या भाषणानंतर भाजपच्या इतर खासदारांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. इतकंच नाही, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही नामग्याल यांची तारीफ करण्याचा मोह आवरला नाही.
34 वर्षांचे सेरिंग नामग्याल पहिल्यांदाच खासदारपदी निवडून आले आहेत. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठं लोकसभा क्षेत्र असलेल्या लडाखचे ते खासदार आहेत. सेरिंग यांचा जन्म 4 ऑगस्ट 1985 रोजी लेहमधील माथो गावात झाला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सेरिंग यांचा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे.