मंगळूर : कनार्टक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी गाजत आहे. मात्र या निवडणुकीत एका श्रीमंत महिलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आपल्या दिराच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात ती उतरली असून तिचा प्रचारही हायटेक आहे. सत्ताधारी भाजप पक्षाच्या विरोधात दंड थोपटून ही महिला आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा आणि स्वतःचाही प्रचार करत आहे. मात्र, या महिलेची संपत्ती ऐकून भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक संपत्ती असलेली उमेदवार असा मान या महिलेला मिळाला आहे.
कर्नाटकचे माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांनी कल्याण राज्य प्रगती पक्षाची ( KPPP ) स्थापना केली आहे. गंगावठी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्याचे बंधू आणि भाजपचे विद्यमान आमदार जी. सोमशेखर रेड्डी हे बेल्लारी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
जी. जनार्दन रेड्डी यांनी आपल्या भावाच्या विरोधात पत्नी अरुणा लक्ष्मी यांना निवडणुकीत उतरविले आहे. भावाविरोधात पत्नीला उमेदवारी दिली असली तरी मला इतर कोणत्याही पक्षावर भाष्य करायचे नाही. जिथे मला जिंकण्याची संधी किंवा शक्यता असेल तिथे मी उमेदवार उभे करेन. कोणालाही पराभूत करण्यासाठी उमेदवार देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते.
जी. जनार्दन रेड्डी यांची पत्नी अरुणा लक्ष्मी या आता बेल्लारी मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. जी. जनार्दन रेड्डी हे कर्नाटकमधील खाण व्यापारीही आहेत. त्यांना खाणसम्राट म्हणूनही ओळखले जाते. मात्र, त्यांच्या संपत्तीपेक्षाही अरुणा लक्ष्मी यांच्याकडे जास्त संपत्ती आहे.
कल्याण राज्य प्रगती पक्षाच्या बेल्लारी मतदारसंघातील उमेदवार लक्ष्मी अरुणा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 1,743 कोटींच्या संपत्तीचा तपशील नमूद केला आहे. त्यांच्याकडे 84 किलो सोन्याचे दागिने, 16.44 कोटींचे हिरे आहेत. तसेच, कोट्यवधींच्या शेतजमिनीसोबतच त्यांच्याकडे 94 बिगरशेती भूखंड आहेत. तर, काही भूखंड भेट म्हणून दिल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
खाण सम्राटच्या पत्नी असणार्या अरुणा लक्ष्मी यांनी या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे, पती आणि मुलगा यांच्याकडे कोणतीही वाहने नसल्याचेही म्हटले आहे.