पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलंय. अजित पवार यांनी आपल्या बंडाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी आपण आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच काम करु, असंही ते म्हणाले. एकीकडे अजित पवार असं बोलत असले तरी पडद्यामागील घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे आपला जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतत असल्याची बातमी समोर आलीय. या सगळ्या घडामोडींवर वकील असीम सरोदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 53 आमदार आहेत. त्यातले 40 आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. हा आकडा खूप महत्वाचा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील 40 आमदार होते. यात विधानसभा अध्यक्ष वेगळा गट स्थापनेबद्दल काय निर्णय देतात हे महत्त्वाचं आहे. या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांची भूमिका फार महत्वाची आहे. म्हणूनच राहुल नार्वेकर यांना जपान दौऱ्यावरून तात्काळ बोलावण्यात आलं असावं”, असा दावा असीम सरोदे यांनी केला
“अजित पवार राष्ट्रवादी पक्ष आम्हीच आहोत, असं म्हणणार नाहीत. कारण त्यायांच्यासोबत 40 आमदार आहेत. पण तरीही अजित पवार यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही. ते वेगळा गट स्थापन करु शकतात किंवा भाजपमध्ये विलीन होऊ शकतात”, अशी कायदेशीर बाजू वकील असीम सरोदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना मांडली.
राज्याच्या राजकारणात आज सकाळीच मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळाल्या. कारण राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि माणिकरावर कोकाटे यांनी काल उघडपणे पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर आज सकाळी एक मोठी बातमी समोर आली. ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार असल्याचं वृत्त दिलं. योग्यवेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याचेही त्यामध्ये म्हटलं होतं. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं. अजित पवार आजच मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा वाढल्या. त्यामुळे राजकारणात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित झाला.
अजित पवार यांनी या सगळ्या घडामोडींनंतर दुपारी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपण कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. पण तरीही पडद्यामागे घडामोडी सुरुच असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या बंडाबाबतच्या वृत्तात कितपत दम आहे हे आगामी काळात स्पष्ट होईलच. पण राज्यात लवकरच सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर राजकारणात मोठं काहीतरी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.