बीडः महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ति संग्राम (Marathwada Mukti sangram) दिनाचे कार्यक्रम घ्यायचे सोडून मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? असे केल्याने इथल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं महत्त्व कळणार कसं, असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. ते आज बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील कार्यक्रमात बोलत होते. माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण अर्थमंत्री असताना मराठवाड्याला किती निधी दिला, हेही अजित पवारांनी आवर्जून सांगितलं.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि अमृत महोत्सवाबद्दल अनुत्साह दाखवण्यात आलाय. मी अर्थमंत्री असताना मराठवाड्यासाठी 75 कोटी निधीची पूर्तता केली होती. मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सव अमृत महोत्सवी वर्षाप्रमाणेच साजरा करायला हवा होता. ही जबाबदारी धनंजय मुंडेंसह इतर नेत्यांना देण्यात आली होती. पण सरकार येत असतात आणि जात असतात. सरकारकडून झालेली बेफिकिरी दुर्दैवी आहे..
औरंगाबाद येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम घाईत उरकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबादेत गेले. पण तिथला कार्यक्रम महाराष्ट्रात इथे घ्यायला हवा होता. मराठवाड्याच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा मिळाला असता, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. बीड जिल्ह्याने अनेक सामाजिक राजकीय नेते महाराष्ट्राला दिले आहेत, त्यांची आठवण सांगत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेखही अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला.