नागपूर | 20 नोव्हेंबर 2023 : जालनाच्या अंबड येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेत सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्या प्रचंड टिका केली होती. यावरुन ओबीसी आणि मराठा संघर्ष निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या एल्गार सभेत सहभागी होणारे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ यांच्या दोन समाजात तेढ निर्माण होणाऱ्या वक्तव्यांना आपला पाठींबा नसल्याचे जाहीर केले आहे. सत्तत राहून समस्या सोडवायच्या असतात, जर ते सत्तेत राहून ते समस्या मांडीत असतील तर सत्तेत का राहता ? असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांना केला आहे.
आपण मी ओबीसी नेता आहे. त्यामुळे ओबीसी मेळाव्याच्या व्यासपीठावर होतो. मात्र, भुजबळ यांनी जे भाषण केले त्याच्याशी मी सहमत नाही. आपले हक्क मांडत असताना दोन समाजात तेढ निर्माण होईल, उभी दरी पडेल याला आपला पाठिंबा नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. भुजबळांवर प्रेशर आहे का ? हे त्यांनाच विचारा..आजकाल सगळ्यांचे कुणबी दाखले घेऊन झाले आहेत. साप निघून गेला आहे. आता काठी मारून काही फायदा नाही. भूमिका मांडताना टोकाची भूमिका घेऊन उपयोग नाही समाजाच्या समस्या सोडायच्या आहेत, गावागावत भांडणं झाली तर त्याला कोण जबाबदार असा सवालही वडेट्टीवार यांनी यावेळी केला. आपली भूमिका आपण आधीच मांडली आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर ही भूमिका मांडलेली नसल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
भरत गोगावले यांनी संजय राऊत यांना कावळ्याची उपमा दिली आहे याप्रश्नावर ते म्हणाले की पिंडदान करताना आपण पूर्वजांना बोलवतो. त्यांचे पूर्वज ते असतील असे उत्तर दिले. तर हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रीमंडळी विस्तार होणार असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे, त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी हल्ली नवनवीन पंडीत तयार होत आहेत. सगळ्या पंडीतांचा आणि ज्योतिषाचा भरणा झाला आहे. मुहूर्त काढत जा आणि टाळत जा अशी परिस्थिती आहे. भरत गोगावले नवीन पंडीत झाले असावेत असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी हाणला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकालावर या राज्याचे भवितव्य अवलंबून आहे. आजच्या परिस्थितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याने आणि संविधानानूसार शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने लागेल असं आपल्याला वाटतं असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आशिष जयस्वाल यांच्याकडे मोठं पद आहे. रेती आणि कोळशाचे काम त्यांच्याकडेच आहे, आता त्यांना कशाला दुसर पद पाहिजे असेही एका प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले