मुंबई:आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता पुन्हा वर्तवली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाची चाचपणी सुरु आहे. लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्यासाठी भाजप उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे.
निवडणूक आयोग जम्मू काश्मीर दिवस दौ-यावर आहे. लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच जम्मू काश्मीरच्या निवडणुकासाठी आयोगाची चाचपणी होत आहे. जम्मू कश्मीरमध्ये सध्या राज्यपाल राजवट आहे.
त्यामुळे जम्मू काश्मीरसह इतर काही राज्यातही एकत्र निवडणुका होण्याची चर्चा सुरु झाली आहे.
मात्र एकत्र निवडणुकांच्या चर्चेने राज्यातील इच्छुक उमेदवारांना धडकी भरली आहे. दरम्यान एकत्र निवडणुका होण्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर 2019 मध्ये संपतो. त्यामुळे चार-पाच महिने आधीच विधानसभा बरखास्त करुन लोकसभेसोबतच महाराष्ट्र, हरयाणा आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुका होण्याबाबत चर्चा सुरु होती. पण मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा फेटाळली होती.
2014 ची निवडणूक
केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या आठवडाभरात करण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुका यासोबत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा पाच मार्च 2014 रोजी करण्यात आली होती. 16 एप्रिलपासून 13 मेपर्यंत पाच टप्प्यात देशभरात मतदान झालं होतं. 16 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. लोकसभेच्या 545 जागांसाठी मतदान झालं होतं. भाजपने बहुमताचा 272 आकडा पार करुन सत्ता स्थापन केली होती.
लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र का नाही?
विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत घेण्याचा विचार असेल, तर आधी विधानसभा बरखास्त करावी लागेल.
विधानसभा बरखास्तीची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागेल.
सध्याचा कार्यकाळ आणि राजकीय परिस्थिती पाहता इतक्या कमी काळात विधानसभा बरखास्त करणं अशक्य आहे.
संबंधित बातम्या