पुणे: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट झाली. या भेटीनंतर पुण्यातील लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदलण्याची शक्यता आहे. कारण संजय काकडे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून, काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यातून लोकसभेसाठी संजय काकडे इच्छुक आहेत. याआधी काकडे यांनी सहयोगी भाजपवर अनेकदा तोंडसुख घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर हे भेट महत्वाची मानली जात आहे.
संजय काकडे काँग्रेसकडून पुण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुणे मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. राष्ट्रवादीही संजय काकडेंना उमेदवारी देण्याच्या तयारीत होती. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने, संजय काकडे काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काकडे यांनाच काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी ही भेट झाली. काकडे आधीपासून काँग्रेसच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
असं असलं तरी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून काकडेंच्या उमेदवारीला विरोध आहे. मूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. मात्र अशोक चव्हाण यांनी जो जिता वही सिकंदर असं वक्तव्य करुन, काकडेंच्या बाजूने झुकतं माप दिलं आहे.
विद्यमान खासदार
दरम्यान, सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता. सध्या विश्वजीत कदम हे वडील पतंगराव कदम यांच्या जागी विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी यावेळी काँग्रेस संजय काकडे यांना उमेदवारी देण्याची चिन्हं आहेत.
संजय काकडे कोण आहेत?
संजय काकडे हे सध्या भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार आहेत. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. भाजपचे सहयोगी खासदार असले, तरी सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. मात्र त्यांनी गेल्या काही निवडणुकांच्या निमित्ताने भाजपवर शरसंधान साधलं.
संबंधित बातम्या