अमेठी (उत्तर प्रदेश) : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकांसाठी अनेक उमेदवार निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. त्यानुसार काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, त्या ग्रॅज्युएट नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण 2004 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी आपण ग्रॅज्युएट झाल्याची माहिती दिली होती. पण नुकत्याच दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांनी आपले ग्रॅज्युऐशन पूर्ण न झाल्याचे नमूद केलं आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतंच दिलेल्या शपथपत्रानुसार, 1991 मध्ये त्या दहावीची परीक्षा पास झाल्या होत्या. त्यानंतर 1993 मध्ये त्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. पण काही कारणात्सव त्या तेव्हा कॉलेज करु शकल्या नाहीत. त्यानंतर 1994 मध्ये पुन्हा त्यांनी दिल्लीच्या मुक्त विद्यापीठात बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी प्रवेशासाठी अर्ज केला. मात्र बी.कॉमची वार्षिक परीक्षा त्यांनी दिली नाही आणि त्यामुळे त्यांना बी.कॉमचे पदवी प्रमाणपत्र मिळाले नाही.
Refresher course (correction)~ The Mantri Version.
Kyunki Mantri Bhi Kabhi Graduate Thhi. pic.twitter.com/22qWPy6LxA— Priyanka Chaturvedi (@priyankac19) April 11, 2019
स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरुन कायम वाद निर्माण झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ ग्रहण करताना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांनी अनेकदा आपण पदवीधर असल्याचा दावा केला होता.
स्मृती इराणी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कपिल सिबल यांच्याविरोधात 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी मी दिल्लीच्या मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्टसची पदवी घेतल्याचे जाहीर केलं होते. त्यानंतर 2011 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम पार्ट 1 ची पदवी घेतल्याचे शपथपत्रात सांगितले होते. तसंच लोकसभा निवडणूक 2014 मध्येही त्यांनी दिल्ली मुक्त विद्यापीठातून बीकॉम पार्ट 1 ची पदवी घेतल्याचे सांगितले होते. तीन निवडणुकांवेळी दिलेल्या विविध शैक्षणिक पात्रतेवरुन त्यांच्यावर अनेकदा टीका झाली होती. विशेष म्हणजे 2014 मध्ये एका कार्यक्रमातही स्मृती यांनी शैक्षणिक पात्रता किती असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध येल युनिव्हर्सिटीतून पदवी घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी तुमच्या शपथपत्रात याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी होमहवन केले होते. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपकडून भव्य रोड शो आणि शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली होती.