Lok Sabha Election 2024 | धार्मिक नाशिकमध्ये रंगला राजकीय आखाडा; महायुतीचे पारडे जड, ठाकरे गटही देणार काटे की टक्कर?

| Updated on: Feb 29, 2024 | 4:29 PM

नाशिकचा खासदार होण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतीलच स्पर्धकांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. मात्र, उमेदवार कुणीही असले तरी प्रमुख लढत ही ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.

Lok Sabha Election 2024 | धार्मिक नाशिकमध्ये रंगला राजकीय आखाडा; महायुतीचे पारडे जड, ठाकरे गटही देणार काटे की टक्कर?
NASHIK LOKSABHA
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीसाठी अनेक जण उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सर्वच पक्षात इच्छुकांची एकच भाऊ गर्दी झाल्याचे दिसतंय. मुंबईची परसबाग, कुंभ नगरी, वाईन कॅपिटल मंदिरांचे शहर, तपोभूमी, द्राक्ष पंढरी अशी विविध ओळख असलेल्या नाशिकचा खासदार होण्यासाठी अनेकांनी कंबर कसलीय. विशेष म्हणजे नाशिकचा खासदार होण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतीलच स्पर्धकांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. मात्र, उमेदवार कुणीही असले तरी प्रमुख लढत ही ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाकडून पुन्हा एकदा लोकसभा लढविण्याची तयारी सुरु केलीय. त्यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही आपली शक्ती पणाला लावलीय. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) गोकुळ पिंगळे हे ही इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत. तर, भाजपकडून जय बाबाजी भक्त परिवारातील जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज आणि स्वामी कंठानंद यांनीही लोकसभेची तयारी सुरु केलीय.

भाजपाकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले. तर, स्वामी कंठानंद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. यासोबतच नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे ही भाजपकडूनच इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी बसपाकडून निवडणूक लढवली होती.

अयोध्येतील रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तपोभूमी असलेल्या धार्मिक नाशिकला राजकीय दृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौरा करत काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही काळाराम मंदिरात येऊन दर्शन घेतले. तर, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये 9 मार्चला पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. त्यापूर्वी ते काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. मनसेचा वर्धापन दिन आणि राज ठकारे यांचे काळाराम मंदिराचे दर्शन हे मनसेदेखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मानले जात आहेत.

हे ही वाचा | ठाकरे, शिंदे की भाजप? मुंबईकर कोणासोबत, काय आहेत राजकीय गणिते?

शिवसेनेकडे (शिंदे गट) असलेली नाशिक लोकसभेची जागा घेऊन त्या बदल्यात धुळेची जागा देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची थेट लढत ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारासोबत होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, सध्या तरी महायुतीचे पारडे येथे जड असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमधील सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे सत्ताधारी पक्षांकडे आहेत.

हे ही वाचा | प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ठरणार किंगमेकर? कुणाला धक्का, कुणाला फायदा

नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे तीन शहरातील मतदारसंघ भाजपकडे आहेत. देवळाली, सिन्नर हे मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत. तर, उर्वरित इगतपुरी या एकाच मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळाली होती. वंचितच्या उमेदवाराने तब्बल 1 लाखाहून अधिक मते घेतली होती. हेमंत गोडसे यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. तर, राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती.

हे ही वाचा | मुंबईतील ‘हे’ खासदार साधणार का विजयाची हॅट्ट्रिक? काय आहेत समीकरणे?

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातील गेल्या निवडणुकीतील पहिले तीन उमेदवार आता महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. तर, शिवसेना (ठाकरे गट) यांची पारंपारिक मते याशिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मतावर ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र, आम आदमी पार्टी, बसला आणि मनसे यांची मते कुणाचा पारड्यात पडणार यावरही विजयाचा कौल निश्चित होईल.

2019 च्या निवडणुकीतील आकडेवारी

हेमंत गोडसे – शिवसेना (शिंदे गट) – 5 लाख 63 हजार 599

समीर भुजबळ – राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजितदादा गट) – 2 लाख 71 हजार 395

माणिकराव कोकाटे – अपक्ष – 1 लाख 34 हजार 527

पवन पवार – वंचित बहुजन आघाडी – 1 लाख 09 हजार 981