लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणूक प्रचाराचा धुरळा थांबला आहे. गेल्या काही दिवसांपासून गडगडणाऱ्या तोफा आता शांत झाल्या आहेत. येत्या 19 तारखेला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पहिल्या टप्प्यात देशभरात 102 जागांसाठी 19 तारखेला मतदान होत आहे. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार आणि दयानिधी मारन आदी नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी रामटेक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया आदी पाच मतदारसंघात मतदान होत आहे. 19 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये देशात अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन (चेन्नई दक्षिण, तामिळनाडू). डीएमके नेते दयानिधी मारन (चेन्नई सेंट्रल, तामिळनाडू), माजी केंद्रीय मंत्री ए राजा (निलगिरी, तामिळनाडू) आणि तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई (कोइम्बतूर) यांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह निवडणूक रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आसामच्या दिब्रुगडमधून तर काँग्रेस नेते गौरव गोगोई जोरहाटमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे गोविंद राम मेघवाल मैदानात उतरले आहेत. गोविंद मेघवाल हे राज्यातील अशोक गेहलोत सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे उभे आहेत. तर, चंद्रपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार उभे असून त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर मैदानात आहेत.
रामटेक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्याम बर्वे मैदानात आहेत. रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर श्याम बर्वे मैदानात उतरले आहेत. तर महायुतीकडून शिंदे गटाचे राजू पारवे मैदानात शड्डू ठोकून आहेत. या मतदारसंघात वंचितने अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा देऊन लढत अधिकच चुरशीची केली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाने विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्याने त्याची नाराजी पक्षाला भोवण्याची शक्याता आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, महायुतीचे अशोक नेते आणि वंचितचे हितेश मडावी यांच्यात लढत होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही चांगली टफ फाईट होण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि वंचितचे उमेदवार संजय केवट यांच्यात लढत होणार आहे.