सांगली : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या दोन टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. त्यानुसार सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना टोला लगावला. “आम्ही सुजय विखे पाटलांना विकत घेतले का फुकट घेतले याची काळजी आम्ही करु, खासदार असूनही तुमच्यावर एक एक मतदार संघ मागण्याची वेळ आली आहे. याची तुम्ही काळजी करा, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टींना लगावला.
संजय काकांचा उमेदवारी अर्ज भरताने चंद्रकांत पाटलांसह, कृषिमंत्री सदाभाऊ खोत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेना आमदार अनिल बाबर, यांसह इतर नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली.
सांगलीमध्ये संजय काका यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे हरण्याच्या भितीने सांगलीचा मतदार तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देत आहात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
तसेच जयंत पाटलांना आपली माणसे सांभाळता येत नाहीत, नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था सध्या जयंत पाटलांची झाली आहे, अशी टिका चंद्रकांत पाटील यांनी केली.
यावेळी काही पत्रकारांनी सांगलीतील विशाल पाटील यांच्या बंडखोरी मागे तुमचा हात आहे का असा प्रश्न चंद्रकांत दादांना उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना माझा सर्व ठिकाणी हात असतो, लोकांना भाजपमध्ये आणण्यापासून मीडियापर्यंत माझा हात आहे. एवढंच नाही तर इतर सर्व चांगल्या कामात माझा हात असतोच अस उत्तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेक उमेदवार विविध ठिकाणच्या मतदारसंघासाठी अर्ज दाखल करत आहेत. तर पक्षातील विविध नेते मंडळी मात्र विरोधकांवर तोंडसुख घेतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
कोण आहेत संजयकाका पाटील?
2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वात सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला होता.
संबंधित बातम्या –