नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखांची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करु शकतो. त्यामुळे देशात एप्रिल ते मे महिन्यादरम्यान निवडणुका होऊ शकतात. लोकसभा निवडणूक 2019 साठी देशभरात 6-7 टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ येत्या 3 जून 2019 रोजी संपणार आह, त्यामुळे नवीन लोकसभा स्थापन होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोग सध्या ही निवडणूक कशाप्रकारे आणि कधी घ्यायची याची तयारी करत आहे.
निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर सर्वत्र आचारसंहिता लागू होईल. यानंतर विद्यमान मोदी सरकार कुठल्याही योजनेची घोषणा करु शकणार नाही. 543 सदस्यांच्या लोकसभेत सध्या भाजपचे 282, काँग्रेसचे 45, शिवसेनेचे 18, समाजवादी पार्टीचे 05 तर इतर पक्षांचे 212 खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर 17 व्या लोकसभेची स्थापना होणार आहे.
सुरक्षा रक्षकांची गरज आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार निवडणुकांचे टप्पे ठरवले जातील. यासर्व व्यवस्थांची चाचणी केल्यानंतर निवडणूक आयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा करु शकतो. लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही निवडणूक आयोग करु शकतो. तर जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा भंग झाल्याने सहा महिन्यांच्या आत तिथे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
याआधी झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा 5 मार्च 2014 रोजी झाली होती. ही निवडणूक 9 टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. 7 मे ते 12 मे 2014 दरम्यान ही निवडणूक झाली होती, तर 16 मे 2014 रोजी मतमोजणी झाली होती. त्यानंतर 26 मे 2014 रोजी मोदी सरकार सत्तेत आलं होतं.