सातारा : भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका… या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याशिवाय अनेकांकडून वैयक्तिक पातळीवरही यासाठी प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या या प्रयत्नांसोबतच व्यासायिकही यात स्वत:हून सहभागी होताना दिसत आहे. साताऱ्यातील साईराम या हॉटेलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला जेवणाच्या बिलावर 40 टक्के भरघोस सूट देण्यात येणार आहे.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. पण अनेकदा कामाच्या निमित्ताने बाहेर राहणारे नागरिक मतदानाच्या वेळी मतदानाचा हक्क बजावत नाहीत. या नागरिकांना मतदानासाठी जागृत करावे, त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा या हेतूने साईराम हॉटेलने जेवणाच्या बिलावर 40 टक्के भरघोस सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
साताऱ्याजवळच्या वेळे गावातील साईराम हॉटेलमध्ये 6 एप्रिलपासून 25 मे पर्यंत हा अनोखा उपक्रम सुरु राहणार आहे. देशभरातील मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात येणाऱ्या ग्राहकांना बिलावर 40 टक्के सुट देण्यात येईल अशाप्रकारचा फलकही त्यांनी हॉटेलबाहेर लावला आहे. या उपक्रमाला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हॉटेलचे मालक विजय यादव हे मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत. तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मतदानाचा हक्क बजवावा असेही सांगत असताना जेवणाच्या बिलावर 40 टक्के भरघोस सूटही देत आहेत.
मतदान हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसा ते प्रत्येकाचं कर्तव्यही आहे. तुमचं एक एक मत या देशाचा भविष्य घडवण्यासाठी महत्वाचे आहे. याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे असे मत साईराम हॉटेलचे मालक विजय यादव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.