भाजपचे वर्चस्व, पण… इंडिया आघाडी विजयाचा झेंडा फडकावणार? त्या महत्वाच्या 49 जागा…

| Updated on: May 18, 2024 | 7:55 PM

2019 मध्ये भाजपने 49 लोकसभा जागांवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या 49 जागांपैकी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने प्रचारात आपली ताकद दाखवून दिली आहे. एका दिवसात अनेक रॅली आणि रोड शो करत आहेत

भाजपचे वर्चस्व, पण... इंडिया आघाडी विजयाचा झेंडा फडकावणार? त्या महत्वाच्या 49 जागा...
NARENDRA MODI AND RAHUL GANDHI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : देशात 18 व्या लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान होत आहे. यातील पाचव्या टप्प्यासाठीचे मतदान 20 मे रोजी होत आहे. या टप्प्यात देशातील 49 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, ओडिशातील 5, बिहारमधील 5, झारखंडमधील 3, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी 1 जागांचा समावेश आहे. या 49 जागांवर मतदान झाल्यानंतर लोकसभेच्या 428 जागांसाठी निवडणूक संपेल. ज्या 8 राज्यांमध्ये या निवडणुका होत आहेत त्यापैकी 7 राज्यांत 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यूपीमधील रायबरेलीची जागा कॉंग्रेसने जिंकली. तर, अमेठीची जागा गमावली. रायबरेली आणि अमेठी हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. पण, यावेळी रायबरेलीमधून सोनिया गांधी यांच्याऐवजी राहुल गांधी हे उमेदवार आहेत. मात्र, या निमित्ताने ज्या राज्यात कॉंग्रेसला यश मिळाले नव्हते त्या राज्यात कॉंग्रेसला किती जागांवर यश मिळेल की भाजप आपल्या ताब्यात असलेली जागा कायम रहाणार याची उत्सुकता आहे.

2019 मध्ये भाजपने 49 लोकसभा जागांवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या 49 जागांपैकी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. भाजपला 32, जेडीयूला 1, एलजेपीला 1, शिवसेना 7, बीजेडीला 1, नॅशनल कॉन्फरन्सला 1 आणि टीएमसीला 4 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच भाजप नेतृत्वाखालील एनडीएला 41 तर यूपीएने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. इतरांनी 5 जागा जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने प्रचारात आपली ताकद दाखवून दिली आहे. एका दिवसात अनेक रॅली आणि रोड शो करत आहेत. तर, काँग्रेसने अमेठी, रायबरेली या जागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

महाराष्ट्रात भाजपसमोर इंडिया आघाडीचे आव्हान

महाराष्ट्रामधील लढत खूपच चुरशीची असल्याचे बोलले जात आहे. येथे धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण अशा 13 लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. 2019 मध्ये शिवसेना पक्षाने 13 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. तर, भाजप 6 जागांवर विजयी झाले होते. त्यावेळी युती असलेल्या शिवसेना आणि भाजप यांनी विरोधकांचा पूर्ण सफाया केला होता. मात्र, यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणात एनडीए आणि भारत आघाडी यांच्यात निकराची लढत होत आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही पक्षांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीची ही लिटमस टेस्ट आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची विभागणी झाली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहेत. तर, भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवत आहे. इंडिया आघाडीच्या आव्हानामुळे ही निवडणूक भाजपसाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

बिहार – झारखंडमध्ये निकराची लढत

पाचव्या टप्प्यात बिहारमधील सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर या 5 जागांवर निवडणुका आहेत. 2019 च्या निवडणुकीत या सर्व जागा NDA कडे होत्या. ज्यात JDU – LJP प्रत्येकी 1 तर भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता होऊ घातलेल्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व आहे. मात्र, मुझफ्फरपूर आणि सारण या दोन जागांकडे सर्वांच्या नजरा लागला आहेत. कारण, मुझफ्फरपूरमध्ये भाजपने उमेदवार बदलला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले खासदार अजय निषाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. जेडीयूनेही सीतामढीमध्ये आपला उमेदवार बदलला आहे. लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य सारणमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत राजीव प्रताप रुडी यांच्याशी आहे. तर, स्वतः चिराग पासवान हाजीपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागांवर लोकांची नजर राहणार आहे. झारखंडमध्येही चतरा, कोडरमा आणि हजारीबाग या 3 जागांवर मतदान होत आहे. मात्र. या तिन्ही जागांवर भाजपचे नियंत्रण आहे. पण, यावेळी या जागांवर इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात निकराची लढत होताना दिसत आहे.

बंगाल आणि ओडिशामधील लढत पाहण्यासारखी…

पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सात जागांसाठी पाचव्या टप्प्यात बंगाल आणि ओडिशा येथील लढत पाहण्यासारखी झाली आहे. बंगालमध्ये बानगाव, हावडा, उलुबेरिया, श्रीरामपूर, हुगळी, आरामबाग आणि बराकपूर या जागांसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. 2019 मध्ये टीएमसी या 7 पैकी 4 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली होती. तर, भाजपला फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या. गेल्यावेळेप्रमाणेच यावेळीही या ठिकाणी निकराची लढत होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ओडिशामध्ये बारगढ, सुंदरगड, बोलंगीर, कंधमाल आणि आस्का या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. 2019 मध्ये भाजपला या पाचपैकी चार जागा जिंकण्यात यश आले होते तर बीजेडीला केवळ एक जागा जिंकता आली होती. भाजपसमोर ओडिशा आणि बंगालच्या जागा राखण्याचे आव्हान आहे तर विरोधकांसमोर युतीचे आव्हान आहे.

उत्तर प्रदेशातील 14 जागांचे गणित काय?

उत्तर प्रदेशमध्ये 14 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये लखनौ, मोहनलालगंज, अमेठी, रायबरेली, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, कौशांबी, फतेहपूर, गोंडा, कैसरगंज, बाराबंकी आणि फैजाबाद यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 1 जागा मिळाली होती तर भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये भाजपने सर्व 14 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर इंडिया आघाडीचे घटकपक्ष सपा (10) आणि काँग्रेस (4) जागा लढवीत आहेत. बसपाही 14 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे 4 जागा जिंकण्यासह काँग्रेससमोर रायबरेलीची जागा राखण्याचे मुख्य आव्हान असेल. त्याचप्रमाणे येथे भाजपची विश्वासार्हताही पणाला लागली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वात हॉट सीट म्हणजे अमेठी आणि रायबरेली आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचे राहुल गांधी यांचा पराभव केल्याने ही जागा अधिक चर्चेत आहे. यावेळी कॉंग्रेसने अमेठीमधून गांधी घराण्याचे विश्वासू किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे अमेठी आणि रायबरेली जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गेहलोत आणि त्यांची टीम अमेठीत, रायबरेलीत काँग्रेसला विजय मिळवून देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.