नवी दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभर फिरत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना त्यांच्या पारंपारिक मतदारसंघ अमेठी मधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा तब्बल 55 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. पण, केरळ येथील वायनाड मतदारसंघाने राहुल गांधी यांना तारले होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघही सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
राहुल गांधी यावेळची लोकसभा निवडणूक वायनाडमधून लढवणार नसल्याची चर्चा आहे. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी दोन मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्याचप्रमाणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत असे या सूत्रांनी सांगितले.
केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) सोबत असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) लोकसभा निवडणुकीसाठी 4 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. CPI हा LDF चा दुसरा सर्वात मोठा घटक आहे. सीपीआयने वायनाड मतदारसंघातून ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय.
सीपीआयचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पन्नियान रवींद्रन यांना तिरुअनंतपुरममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या या जागेचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर करत आहेत. यासोबतच सीपीआयने माजी कृषी मंत्री व्हीएस सुनील कुमार यांना त्रिशूर आणि युवा विंग ऑल इंडिया युथ फेडरेशनचे नेते सीए अरुणकुमार यांना मावेलिक्कारा येथून उमेदवारी दिली आहे.
सीपीआयने आपले चार उमेदवार जाहीर केल्यामुळे कॉंग्रेसची अडचण झाली आहे. मित्रपक्ष सीपीआय विरोधात लढायचे की राहुल गांधी यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधायचा अशा विवंचनेत कॉंग्रेस नेते सापडले आहेत. तर, 2019 च्या निवडणुकीत झालेली अमेठीसारखी पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. कर्नाटक किंवा तेलंगणा राज्यातील एक आणि उत्तर प्रदेशातील एका जागेवरून अशा दोन ठिकाणाहून राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.