नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापुर्वीच भाजपने ‘अब की बार, 400 पार’चा नारा दिला. भाजपच्या या नाऱ्यामुळे विरोधकांना धडकी भरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासकामांमुळेच जनता पुन्हा आपल्याला भरभरून मते देतील असा विश्वास व्यक्त केला. तर, विरोधकांनी भाजपला 400 जागा पार करून संविधान बदलायचे आहे आणि आरक्षण संपवायचे आहे, असा आरोप केला. देशात हुकूमशाही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एनडीएने 400 जागांचा आकडा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचेही विरोधकांनी म्हटले. यावरून दावे प्रतिदावे सुरु असतानाच भाजपच्या बड्या नेत्याने ‘अब की बार, 400 पार’ या घोषणेमागचे गणित उघड केले आहे. आपल्या पक्षाला 400 जागांची गरज का आहे हे या नेत्याने सांगितले आहे.
भाजपच्या या घोषणेवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली होती. राहुल गांधी यांनी काही आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे एका रॅलीला संबोधित केले. भाजपच्या 400 पार या घोषणेवर निशाणा साधताना ते म्हणाले, भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे. त्यामुळे त्यांना 400 पेक्षा जास्त जागांची गरज आहे. भाजप नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सत्तेत आल्यास ते संविधान बाजूला ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे. भाजपचे नेते आरक्षण हिसकावून घेणार असल्याचे सांगत आहेत. पण, कॉंग्रेस आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वाढवणार आहे असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले होते.
विरोधकांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ”संविधानाच्या रक्षणासाठी आपण आपल्या प्राणाचीही आहुती देऊ. काँग्रेसनेच संविधानावर हल्ला केला होता. पण ती वेळ आता निघून गेली आहे. म्हणूनच मी म्हणतो की, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत मी या संविधानासाठी लढत राहीन. त्यासाठी माझ्या प्राणाची आहुती देईन.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निशिकांत दुबे यांनी जोरदार पलटवार केला आहे. भाजपने 400 जागांचे लक्ष्य पार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. भाजपचा संविधान बदलण्याचा कोणताही विचार नाही. एनडीए आणि भाजपला 400 जागांची गरज आहे ती याकरता की पाकव्याप्त काश्मीरला (पीओके) भारतात विलीन करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.