सोलापूर : राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजित निंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. दोन्हीही उमेदवार प्रमख राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवत असले तरी दोघांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच आपापले पक्ष सुद्धा बदलले आहेत हे विशेष. त्यामुळे या दोन्हीही दलबदलू नेत्यांमध्ये मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
देशातल्या प्रमुख लोकसभा मतदारसंघापैकी महत्वाचा मानला जाणारा माढा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आधी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेगाने तो निर्णय मागेही घेतला. त्यामुळे पवारांच्या जागी कोण उमेदवार राहणार याची उत्सुकता होती.
वास्तविक पाहता मोदी लाटेतसुद्धा विजय मिळवणाऱ्या या मतदार संघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते, मात्र झाले उलटेच. कधी या मतदारसंघात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख किंवा शरद पवार ही दोन्ही नावं चर्चेत ठेवून राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परिणाम म्हणून मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा घरोबा केला. तर इकडे भाजपच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आणि मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांनी थेट त्यांची माढा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली.
भाजपची मदत घेऊन जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष झालेले संजय शिंदेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दूर केल्यामुळे, राष्ट्रवादीचा गड खाली करण्यासाठी मातब्बर असलेला संजय शिंदे रुपाने उमेदवार मिळण्याच्या भाजपच्या मनसुब्यालाच धक्का बसला. त्यामुळे मुख्यमंत्री,चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. म्हणूनच महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय शिंदे यांच्या साखर कारखान्याची चौकशी करणार असल्याचं सांगितलं.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन संजय शिंदे यांनी स्वीकारत, भाजपमध्ये जे येत नाहीत त्यांना धमकवण्याची भाजप नेत्यांचीही पद्धतच असल्याचं म्हटलं. अनेक जण भाजपच्या अशाप्रकारच्या धमक्यांना बळी पडले, मात्र मी एकमेव बळी न पडल्याचा दावा संजय शिंदे केला.
भाजपने मोहिते पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपात आणून, राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. माण खटाव भागातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि वजनदार नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपात आणले आणि त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे माढा मतदारसंघात दोन दलबदलू नेत्यांमध्ये लढत होत आहे.
वास्तविक राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची पूर्वी खूप जवळीक होती. मात्र शिंदे यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश निंबाळकराना रुचला नाही. त्यातूनच निंबाळकर यांची उमेदवारी पुढे आल्याची चर्चा आहे.
एकूणच आता माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीपेक्षा स्वतः शरद पवार यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा बनला आहे. तर दुसरीकडे थेट शरद पवारांशी पंगा घेऊन भाजपात प्रवेश केलेले मोहिते पाटील आणि मुख्यमंत्र्यासाठी भाजपचा गड जिंकून आणण्याचे मोठे आव्हान आहे.