सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी खासदार रणजीतसिंहांचं कौतुक केलं. खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील लोकांसाठी घेतलेल्या पाण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल राजेंनी रणजित निंबाळकरांचे कौतुक केले.
नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं अनधिकृत पाणी रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. माढ्याचे खासदार रणजीत निंबाळकर यांच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला. या पाठपुराव्याबद्दल उदयनराजेंनी रणजीतसिंह निंबाळकरांचं कौतुक केलं.
उदयनराजेंचा पवारांना टोमणा
दरम्यान, नीरा डाव्या कालव्याचे पाणी सोडल्यावरुन साताऱ्याचे राष्ट्रावादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. “नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी उशीरच झाला. हा अध्यादेश आघाडीच्या कार्यकाळातच अगोदरच काढायला हवा होता”, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नीरा डाव्या कालव्याचे अनधिकृत पाणी माढ्याला देण्यावरुन राजकारण सुरु आहे. त्यात उदयनराजेंनीही उडी घेतली.
काय आहे पाणी प्रश्न?
वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचं धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरलं होतं. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये निरा देवघर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होतं.
नियमबाह्य पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली.
जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारं पाणी कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, निरा – देवघर या धरणातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाणारं पाणी कायमस्वरुपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना 100 टक्के होणार आहे.
संबंधित बातम्या :
माढ्याच्या पाण्यावरुन उदयनराजेंचा पवारांना टोला
आधी शरद पवारांची भेट, नंतर उदनयराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर