मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 च्या मे महिन्यात लोकसभा निवडणुका होतील. पर्यायाने निवडणुकीला अवघे पाच ते सहा महिने बाकी आहेत. त्यामुळे अर्थात, सगळ्याच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच भाजपने सुद्धा कंबर कसली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षण सुद्धा केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र ‘मिड डे’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.
‘मिड डे’च्या वृत्तानुसार, 2019 साली भाजपकडून माधुरी दीक्षितला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. माधुरीसाठी मुंबई आणि पुण्यातील मतदारसंघांची चाचपणी झाली. त्यात पुण्यातून माधुरीला लोकसभेसाठी उतरवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजपचे कट्टर कार्यकर्ते, काहीशे तटस्थ आणि भाजपविरोधक अशा मतदारांकडून भाजपने या सर्वेक्षणाअंतर्गत मतं जाणून घेतली.
माधुरी दीक्षितसाठी पुण्यातील ज्या जागेचा विचार केला जात आहे, त्या जागेचं लोकसभेतील प्रतिनिधीत्व सध्या भाजपचे खासदार अनिल शिरोळे करत आहेत. माधुरीला याच मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास अनिल शिरोळे यांच्या खासदारकीची विकेट पडणार हे निश्चित मानले जात आहे. त्याचवेळी या जागेसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे माधुरीचं नाव निश्चित झाल्यास, इथे नाराजी निर्माण होण्याची शक्यताही आहे.
भाजपच्या पुणे जिल्हाध्यक्षांनी फेटाळलं
“आमचं संसदीय मंडळ जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. मात्र, आतापर्यंत माधुरी दीक्षितबाबत कोणताच निर्णय झाला नाही.”, असे पुण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष योगेश गोगावले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केले.
गंभीर आणि सेहवागही भाजपकडून रिंगणात?
भाजपच्या सेलिब्रिटी उमेदवारांच्या यादीत टीम इंडियाच्या दोन माजी खेळाडूंचाही समावेश आहे. त्यातील एक आहे वीरेंद्र सेहवाग, तर दुसरा आहे गौतम गंभीर. सेहवागसाठी हरियाणातील रोहतकमधून, तर गंभीरसाठी नवी दिल्लीतून लोकसभा जागेची चाचपणी केली जाते आहे.
देशात जिथे भाजपचे उमेदवार विजयी झाले नाहीत, अशा ठिकाणी भाजप सेलिब्रिटींना उमेदवारी देण्यावर अधिक विचार करु शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
गुरुदासपूरमधून कोण?
पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भांगडा किंग गुरदास मान यांना भाजपकडून उमेदवारीची शक्यता आहे. या जागेवरुन दिवंगत अभिनेते विनोद खन्ना खासदार होते. काही वृत्तांनुसार, ‘बॉलिवूडचा खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचा सुद्धा गुरुदासपूरच्या जागेसाठी विचार झाला होता. मात्र, अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनेडीयन आहे. त्यामुळे त्याला भारतात निवडणूक लढवणं शक्य नाही.
भाजपने 2014 साली सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. भाजपचा हा फॉर्म्युला तसा यशस्वी मानला जातो. या यादीत हेमा मालिनी, किरण खेर, बाबुल सुप्रियो, मनोज तिवारी, स्मृती इराणी इत्यादी काही नावं प्रामुख्याने समोर येतात. त्याआधी किर्ती आझाद, शत्रुघ्न सिन्हा इत्यादी सेलिब्रिटी भाजपच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे हाच सेलिब्रिटी फॉर्म्युला भाजप 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अंमलात आणण्याची दाट शक्यता आहे.