Madhya Pradesh Election Exit Poll Result 2023 | 30 नोव्हेंबर 2023 : मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 जागांपैकी 116 हा बहुमताचा जादुई आकडा पार कोण करणार याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. यानुसार काँग्रेसला 230 पैकी 111 ते 121 तर भाजपला 106 ते 116 जागा मिळण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने नाकारले असाच अर्थ निघत आहे. मतदानपूर्व घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असे सांगण्यात येत होते. परंतु, एक्झिट पोलने काही वेगळाच अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
मध्यप्रदेशाच्या या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने आपले 230 उमेदवार उभे केले. बसपचे 181, समाजवादी पक्षाचे 71 आणि 1166 अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षणातून मध्य प्रदेशात काँग्रेसला पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार असे स्पष्ट होत आहे. 111 ते 121 जिंकून कॉंग्रेस पूर्ण बहुमतात येईल असे अंदाज आहेत. या सर्वेक्षणात भाजपला महिलांची मते मिळाली आहेत. तर, पुरुष मतदार काँग्रेसच्या बाजूने अधिक आहेत असेही दिसून आले.
मतदारांनी वचपा काढला?
2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी केवळ दोन जागा हव्या होत्या. त्यामुळे बसपा आणि अपक्ष यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे सरकार सत्तेत आले. भाजपला या निवडणुकीत 109 जागा मिळाल्या होत्या. तर, बसपा 2 आणि अपक्षांनी 5 जागा जिंकल्या होतंय.
कॉंग्रेसचे कमलनाथ यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूण शपथ घेतली. परंतु, मार्च 2020 मध्ये माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली 22 काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केली. त्यांच्या पाठींब्यावर भाजपने सरकार स्थापन केले. शिवराज सिंह चौहान यांनी भाजपचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली.
साधारणता कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी अडीच अडीच वर्ष मध्यप्रदेशमध्ये सत्ता उपभोगली. मात्र, आता झालेल्या निवडणुकीत मतदारांचा कौल हा कॉंग्रेसच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. पोल स्टेटने जे सर्व्हेक्षण केले त्यात महिलांचा आवडता पक्ष म्हणून भाजप समोर आला आहे. सुमारे ४७ टक्के महिलांनी भाजपच्या बाजूने मतदान केले. तर, 43 टक्के पुरुष मतदारांनी काँग्रेसला समर्थन दिले असेही समोर आले आहे.
या जागांसाठी होतेय चुरशीची लढत
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (बुधनी मतदारसंघ), कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (छिंदवाडा मतदारसंघ), केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर (दिमनी मतदारसंघ), केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (नरसिंगपूर मतदारसंघ), नरोत्तम मिश्रा (दतिया मतदारसंघ), दिग्विजय सिंह यांचा मुलगा जयवर्धन सिंग (राघोगड मतदारसंघ), भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (इंदूर मतदारसंघ), माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांचा मुलगा अजय सिंह (चुरहट मतदारसंघ) याशिवाय भाजप खासदार राकेश सिंग, गणेश सिंग आणि रीती पाठक हे ही विधानसभेच्या रिंगणात आहेत.