भोपाळ | 6 डिसेंबर 2023 : मध्यप्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज केलीय. निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून मध्य प्रदेशमध्ये अनोख्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. दतिया जिल्ह्यातील भांडेर मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस उमेदवार यांच्यात चुरशीची लढत झाली. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर रक्षा सिरोनिया यांनी ही जागा जिंकली होती. मात्र, आमदार रक्षा सिरोनिया यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत रक्षा सिरोनिया यांना तिकीट न देता भाजपने माजी आमदार घनश्याम पिरोनिया यांना तिकीट दिली. तर, कॉंग्रेसने दलित नेते फूलसिंग बरैया यांना उमेदवारी दिली.
निवडणूक होण्यापूर्वी प्रचारा दरम्यान फूलसिंग बरैया यांनी भाजपला राज्यात 50 जागा मिळाल्यास तोंड काळे करू, असे विधान केल होते. त्यांच्या या विधांनाची मध्य प्रदेशमध्ये मोठी चर्चा झाली होती. मात्र, आता राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे काँग्रेस आमदार बरैया हे राजधानी भोपाळमध्ये उद्या ७ डिसेंबरला स्वतःच्या तोंडाला काळे फासणार आहेत.
मात्र, त्याआधीच ग्वाल्हेरमध्ये एक नाट्यमय घटन घडली. आमदार फूलसिंग बरैया यांचे समर्थक किसान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस योगेश दंडोतिया यांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून घेत भाजपविरोधात आघाडी उघडली. या घटनेनंतर काँग्रेस नेते राजेंद्र सिंह यांनी आमचे नेते फूलसिंग बरैया यांचे तोंड काळे करण्याची गरज नाही. भाजपला दलितांचे तोंड काळे करायचे आहे अशी टीका केलीय,
भाजपने प्रत्येक व्यक्तीला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे बरैया यांचे तोंड काळे करण्याची गरज नाही. काँग्रेस कार्यकर्ते आमदार फूलसिंग बरैया यांना भोपाळ येथे तोंडाला काळे फासण्यापासून रोखणार आहेत. आमदार यांचे तोंड काळे नव्हे तर त्यांचा सन्मान करायला हवा, असे या समर्थकांचे म्हणणे आहे. बरैया हे रामाचे खरे वंशज आहेत. कारण, ‘प्राण जाएं पर वचन न जाए…’ या वचनाप्रमाणे ते कृती करण्यास सज्ज झाले आहेत. तर, दुसरीकडे भाजपनेही फुलसिंग बरैया यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.