भोपाळ | 3 डिसेंबर 2023 : मध्यप्रदेशात निवडणूक कलांमध्ये भाजपने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून कलांमध्ये बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्या मानाने मध्यप्रदेशातील काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची ठरली आहे. असं असलं तरी आता मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. भाजप पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांच्या हातीच राज्याची सत्ता देणार की अन्य कुणाला मुख्यमंत्री करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कदाचित भाजप मध्यप्रदेशसाठी मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्याने सर्वांच्या नजरा मध्यप्रदेशावर खिळल्या आहेत.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार मध्यप्रदेशात भाजपला 161 तर काँग्रेसला 66 जागा मिळताना दिसत आहे. मध्यप्रदेशात भाजपला प्रचंड मोठा फायदा होताना दिसत आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. एक्झिट पोलमध्ये मध्यप्रदेशातून भाजपची सत्ता जाणर असल्याचं सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात एक्झिट पोलचे कल खोटे ठरले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी राज्यात एकच जल्लोष केला आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या विजायचं क्रेडिट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. राज्यात मोदींच्या प्रचंड सभा झाल्या. लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. लोक त्यांच्याशी जोडल्या गेले. त्यामुळे आज निकाल वेगळा लागला आहे. केंद्रातील मोदी सरकारने जे काम केलं आहे. ज्या योजना आणल्या त्याची आम्ही योग्यप्रकारे अंमलबजावणी केली. आम्ही राज्यात लाडली लक्ष्मीपासून ते लाडली बहन पर्यंतच्या स्कीम लागू केल्या. लोकांना या स्किम आवडल्या. याचवेळी गृहमंत्री अमित शाह यांनीही आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्यांनी निवडणुकीला दिशा देण्याचं काम केलं. तसेच आमच्या कार्यकर्त्यांनीही प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळेच आम्ही विजयी झालो, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
भाजपने मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. गावागावात जाऊन हा प्रचार करण्यात आला होता. पण या निवडणुकीत शिवराज सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं नव्हतं. शिवराज सिंह चौहान दोन दशकांपासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी असल्याची चर्चा होती. त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आलं नव्हतं. पण आजच्या निकालाने सर्वच समीकरण बदललं आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान राहणार की जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, भाजपला ज्या पद्धतीने विजय मिळाला आहे, त्यावरून चौहान हेच मुख्यमंत्री होतील असा कयासही वर्तवला जात आहे.
शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री केल्यास ते राज्यात पाचव्यांदा मुख्यमंत्री होतील. मात्र, त्या व्यतिरिक्त ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, व्हीडी शर्मा आदींची नावेही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. ही नावे चर्चेत असली तरी शिवराज सिंह चौहान यांना पार्टी दुखावणार नसल्याचंही सांगितलं जात आहे.