मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (Maharashtra Assembly Speaker Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सावध पवित्रा घेताना दिसत आहे. विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवणार
तशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित झाला आहे. प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असून या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पावसाळी अधिवेशनातच घ्यावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली होती. तसंच भाजपकडूनही विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी होत होती. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची चिन्हं आहेत.
विधानसभा अध्यक्ष कोण होणार?
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खुर्चीवर कोण विराजमान होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
विधानसभा अध्यक्षांचं काम काय?
विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत व्यापक अधिकार आहेत.
विधानसभा अध्यक्षांची निवड सदस्यांद्वारे मतदान प्रक्रियेद्वारे होते. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाकडून उमेदवार विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात.
सदनाच्या आवारात विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असतात. विधानसभेची व्यवस्था टिकवून ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि विधानसभेतील सदस्यांनी नियमांचे पालन केले आहे, की नाही, यावर ते देखरेख करतात.
सभागृहातील सर्व सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आदरपूर्वक ऐकणं अपेक्षित असतं. ते सभागृहाच्या चर्चेत सहभाग घेत नाहीत, परंतु ते विधानसभेच्या कामकाजादरम्यान आपला निर्णय देतात. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष कामकाज पाहतात.
सभागृहातील एखाद्या सदस्याला आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल, तर तो विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द (Assembly Speaker Rights) करतो.
संबंधित बातम्या:
आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; आता पवारांचाही निर्वाळा
परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : उद्धव ठाकरे
(Maha Vikas Aghadi planning to change rules to elect Maharashtra Vidhansabha Assembly Speaker)