कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, काय आहे मागणी?

| Updated on: Feb 28, 2023 | 10:40 AM

शेतकऱ्यांचा कांदा आणि कापसाला योग्य भाव दिला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विरोधकांनी दिला.

कापसाच्या टोप्या, कांद्याच्या माळा, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, काय आहे मागणी?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनायक डावरुंग, मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session) आजचा दुसरा दिवस आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाला. कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी सुरु केली. कापसाला आणि कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे हा शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी डोक्यावर कापसाची टोपी, गळ्यात कांद्याच्या माळा अशी वेशभूषा करत विधिमंडळ पायऱ्यांवर आज जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना योग्य भाव दिला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विरोधकांनी दिला.

अमोल मिटकरींच्या डोक्यावर कांद्याचं टोपलं..

विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनोखी वेशभूषा केली. त्यांनीदेखील गळ्यात कांद्याची माळ घातली होती. तसेच डोक्यावर कांद्याचं टोपलं घेऊनच ते फिरू लागले. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव दिला नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू, असा कठोर इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवला. १ रुपया उत्पन्न आहे आणि ७ ते ८ रुपयांनी कांदा बाहेर विकला जात आहे. कापसाचीही तीच स्थिती आहे. शेतकऱ्याचा कांदा सरकारने विकत घेतला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

मिटकरी काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, ‘ शेतकऱ्यांचे वांदे जे फडणवीस सरकारने केले आहेत, त्यांना कांद्याचा हार घालायला आम्ही इथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली. लाखो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. एका शेतकऱ्यासाठी कारवाई करून उपयोग नाही. तर सगळेच शेतकरी संकटात आहेत. कांद्याला योग्य भाव मिळाला नाही तर या सरकारला आम्ही कांद्यासारखं सोलून काढू, असा इशारा मिटकरी यांनी दिला.