वाशिम : वाशिम जिल्ह्यात कारंजा, वाशिम आणि रिसोड हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. तर रिसोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.
प्रमुख राजकीय नेते
१)शिवसेना खासदार भावना गवळी,
२)भाजप आमदार राजेंद्र पाटणी
३)काँग्रेस चे माजी खासदार अनंतराव देशमुख
४)राष्टवादी काँग्रेस चे माजी मंत्री सुभाष ठाकरे
यवतमाळ – वाशिम लोकसभा 2019
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी 117,939 मतांनी विजयी झाल्या आहेत. भावना गवळी यांना एकूण 5 लक्ष 42 हजार 98 मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना 4 लक्ष 24 हजार 159, भारिपचे प्रविण पवार यांना तिसऱ्या क्रमांकावर 94 हजार 228 मते पडली.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात वाशिम आणि कारंजा हे दोन विधानसभा येतात.
1) वाशिम विधानसभा मतदारसंघ (Washim Vidhansabha)
वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड आणि कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव आहे. काँग्रेसचे सुरेश इंगळे वगळता मागील 25 वर्षापासून हा मतदारसंघ भाजपचा गड राहिला आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपचे आमदार लखन मलिक करत आहेत. ते तिसऱ्यांदा आमदार आहेत. वाशिम मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर आणि वाशिम नगर पालिकांपैकी वाशिम शिवसेनेकडे तर, मंगरुळपीर भारिप बहुजन महासंघाकडे आहे.
या दोन शहरांमध्ये सध्या रस्त्याची कामे झाली आहेत. मात्र, औद्योगिक वसाहत, मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारी योजना, तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. या दोन तालुक्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. या मतदारसंघात भाजपकडून लखन मलिक, शाम खोडे, राहुल तुपसांडे,संगिता इंगोले,नागेश घोपे,दीपक ढोके, काँग्रेसकडून समाधान माने, वाय. के. इंगोले, माजी आमदार सुरेश इंगळे भारिप बहुजन महासंघाकडून डॉ. नरेश इंगळे हे संभाव्य उमेदवार असू शकतात.
वाशिम विधानसभा 2014 निकाल
1)लखन मलिक – भाजप – 48196 मते
2) निलेश पेंढारकर – शिवसेना – 43196 मते
3) सुरेश इंगळे – काँग्रेस – 35968 मते
4)दीपक ढोके -राष्ट्रवादी काँग्रेस -21690 मते
भाजप चे लखन मलिक हे 5000-मतांनी विजयी झाले होते.
वाशिम विधानसभा राजकीय,सामाजिक समीकरणे
वाशिम विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अडीच लाखाच्या जवळपास मतदार संख्या असलेल्या या मतदार संघात 22 टक्के मराठा, 11 टक्के मुस्लिम ,13 टक्के दलित, 7 टक्के माळी,4 टक्के धनगर आणि इतर मतदारांचे 3 टक्के प्रमाण आहे.
या मतदारसंघात सतत तीन वेळा भाजपने विजय मिळविला आहे. मतांचे धृवीकरण होत असल्याने भाजपचा विजय सुकर होत आला आहे. यावेळी मात्र भारिपने या मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे. काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या मुस्लिम आणि दलित मतांवर भारिपचा प्रभाव असल्याने, यावेळी ही निवडणूक भारिप विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीचे संभाव्य चित्र
या मतदार संघात वाशिम आणि मंगरुळपीर हे दोन तालुके येतात. यामध्ये मंगरुळपीर नगर पालिका भारिपच्या ताब्यात आहे.तर वाशिम नगरपालिकेत केवळ 47 टक्के मतं घेऊन भारिपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारचा पराभव झाला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारिप, भाजप आणि काँग्रेस असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे.
2) कारंजा विधानसभा मतदारसंघ (Karanja Vidhansabha)
आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा केला आहे. भाजपा-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यमान आमदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या पाटणींचा मतदारसंघ ताब्यात घेणे हेच शिवसेनेसमोर आव्हान आहे. ते त्यांनी पेलल्यास या मतदारसंघाचे राजकीय चित्रच बदलण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी याच अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश घेणारे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय अस्तीत्वाची लढाई आहे. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या माध्यमातून कारंजा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा आणि आपली उमेदवारी ‘फायनल’ व्हावी, यासाठी तगडी फिल्डींग लावली आहे.
दुसरीकडे शिवसेनेशी काडीमोड करून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेले तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विद्यमान आमदार पाटणी यांनी मतदारसंघावर भक्कम अशी पकड निर्माण केली आहे.
त्यामुळे 2019 च्या निवडणुकीतही कारंजा मतदारसंघ भाजपाच्याच वाट्याला राहावा आणि आपली उमेदवारी पक्की व्हावी, यासाठी पाटणी निश्चित आग्रही आहेत. हा मतदारसंघ भाजपाकडेच कायम राहिल्यास प्रकाश डहाके एकतर अपक्ष किंवा त्यांच्या जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरतील अशी राजकीय शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र, कारंजा नगर पालिका आणि मानोरा नगरपंचायत ही भारिपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघात भाजपनंतर भारिप बहुजन महासंघाची चांगली ताकद आहे. विकासाच्या संदर्भात मात्र, हा मतदारसंघ मागासलेला आहे. कारंजा शहरातील पुरातन वेशींची डागडुजी हा जिव्हाळ्याचा व प्रलंबीत प्रश्न आहे. या मतदारसंघात आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र, ग्रामीण भागात सिंचनाच्या सुविधा अत्यल्प आहेत. या मतदारसंघात भाजपकडून आमदार राजेंद्र पाटणी, शिवसेनेकडून प्रकाश डहाके, राष्ट्रवादीकडून चंद्रकांत ठाकरे, युसूफ पुंजाणी, अपक्ष हेमेंद्र ठाकरे हे इच्छुक आहेत.
कारंजा विधानसभा 2014 निकाल
1)राजेंद्र पाटणी- भाजप-44498
2)युसुफ पुजानी -भारिप -40457
3)रणजित जाधव – मनसे-29696
4)प्रकाश डहाके -अपक्ष -26729
भाजप चे राजेंद्र पाटणी हे -4147 -मतांनी विजयी झाले होते.
कारंजा विधानसभा राजकीय आणि सामाजिक समीकरणे
कारंजा विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. राजेंद्र पाटणी येथून प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघात मराठा 40 टक्के, मुस्लिम आणि दलित प्रत्येकी 10 टक्के मतदान आहे. तसेच या मतदारसंघातील मानोरा कारंजा तालुक्यात बंजारा समाजाचेही प्राबल्य आहे. एकूण मतदानापैकी तब्बल 18 टक्के मतदान बंजारा समाजाचे आहे.
आगामी निवडणूकीचे संभाव्य चित्र
विधानसभा निवडणुकीमध्ये युती झाली तर हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाऊ शकतो. यामुळे यावेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले प्रकाश डहाके,भारीपचे युसुफ पुंजानी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुभाष ठाकरे किंवा चंद्रकांत ठाकरे असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे.
3) रिसोड विधानसभा मतदारसंघ (Risod Vidhansabha)
वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत ‘मोदी लाट’ थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखली होती. अमित झनक हे 12 हजार मतांनी विजयी झाले होते. काहीसा अपवाद वगळता मागील 3 पिढ्यांपासून झनक कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातील यावेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. यावेळी या मतदारसंघात भारिपचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे इथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या 4 वरुन 3 करण्यात आली. पूर्वी असलेला मेडशी मतदारसंघ रद्द करुन नवीन रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वापार कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात 2 वेळा भाजपचे विजयराव जाधव यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीय संवेदनशील मतदारसंघ म्हणजे रिसोड. पूर्वी या मतदारसंघांची मेडशी अशी ओळख होती. मात्र 2009 मध्ये या मतदारसंघाला ‘रिसोड’ ही नवी ओळख मिळाली. या मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा आणि झनक घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. रामराव झनक,सुभाष झनक यांच्यानंतर आता अमित झनक हे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
आमदार अमित झनक येथून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, या दोन तालुक्यातील नगर पालिका आणि पंचायत समित्यांवर भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. या मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक, नकुल देशमुख, भाजपकडून राजू पाटील राजे, विजय जाधव वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप जाधव, प्रा. प्रशांत गोळे, वामन सानप हे इच्छुक आहेत.
रिसोड विधानसभा 2014 निकाल
1) अमित झनक -काँग्रेस – 70939
2) विजय जाधव-भाजप -54131
3)विश्वनाथ सानप – शिवसेना-18425
4) रामकीशन काळापाड- भारिप- 15348
काँग्रेस चे अमित झनक हे -16708 -मतांनी विजयी झाले होते.
रिसोड विधानसभा राजकीय आणि सामाजिक समीकरणे
रिसोड विधानसभा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. मोदी लाटेतही या मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक यांनी विजय मिळविला होता .या मतदारसंघात मराठा समाजाचे 55 टक्के , तर मुस्लिम आणि दलित समाजाचे प्रत्येकी 11 टक्के मतदान आहे. या मतदारसंघात कायम जातीय समीकरणावर निवडणूक झाली आहे. या मतदारसंघात वंजारी समाजाचे मतदानही 16 टक्क्यांवर आहे.
आगामी निवडणुकीचे संभाव्य चित्र
या मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होण्याऐवजी तिरंगी लढतीचे चित्र समोर येत आहे. विद्यमान आमदार अमित झनक यांचे कट्टर समर्थक तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे यांचा चिरंजीव प्रशांत गोळे, वामन सानप यांनी भारिपचा झेंडा हातात घेतला आहे. वामन सानप यांच्यामुळे 5 टक्के आदिवासी आणि 12२ टक्क्यांवर वंजारी मते आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची मते ग्राह्य धरल्यास लढतीत येण्याची शक्यता आहे.