Ajit Pawar Ncp Candidate list : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे.
अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. अजित पवारांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला होता. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले होते.
अमित शाह हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना अजित पवार आणि अमित शाहा यांची मुंबई विमानतळावर बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. “महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे. राज्यात बिहार पॅटर्न राबवावा”, असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शाह यांच्यापुढे ठेवला. आता यावर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.