भाजपच्या माजी मंत्र्याकडून सुजय विखेंचा पत्ता कट? विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, मतदारसंघही ठरला

| Updated on: Sep 20, 2024 | 3:57 PM

राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी यंदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या माजी मंत्र्याकडून सुजय विखेंचा पत्ता कट? विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, मतदारसंघही ठरला
Follow us on

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघ, जागावाटप याची चाचपणी सुरु झाली आहे. अशातच आता इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत आहेत. आता अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे आता राहुरी विधानसभेची लढत रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.

गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी यंदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी कर्डिले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे मी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, असे शिवाजी कर्डिले यांनी म्हटले.

राहुरीतून निवडणूक लढवण्यावर ठाम

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे राहुरी विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात होतं. त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली होती. मात्र आता शिवाजी कर्डिले यांनी स्वत: आपण राहुरीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तसेच श्रीगोंद्याऐवजी राहुरीतून निवडणूक लढवण्यावर मी ठाम असल्याचेही शिवाजी कर्डिले यांनी म्हटलो होते. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार आहे.

राहुरी मतदारसंघात महायुतीत वादाची ठिणगी?

दरम्यान शिवाजी कर्डिले हे राहुरीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने आता माजी खासदार सुजय विखे पाटील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे राहुरी मतदारसंघात महायुतीत वादही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.