महायुतीच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु, शिंदे, फडणवीस, अजित पवारांची नागपुरात महत्त्वाची बैठक, आजच जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब?

| Updated on: Sep 19, 2024 | 4:01 PM

आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु, शिंदे, फडणवीस, अजित पवारांची नागपुरात महत्त्वाची बैठक, आजच जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब?
महायुती
Follow us on

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदा विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढाई पाहायला मिळणार आहे. सध्या या आघाडीतील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तर दुसरीकडे जागावाटप, मुख्यमंत्रिपद, तसेच उमेदवार याबद्दल चर्चा होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीच्या गोठात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. रात्री १०.३० दरम्यान ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल. या बैठकीत प्रामुख्याने जागावाटपावर चर्चा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपकडून १६४ जागांवर दावा

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप गेल्या विधानसभेत लढलेल्या जागांएवढ्याच जागा आता लढणार असल्याचे बोललं जात आहे. भाजपने विधानसभेला १६४ जागांवर दावा केला आहे. तर उर्वरित जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महायुतीत ८० टक्के जागावाटपाचे काम पूर्ण झाले आहे. तर २० टक्के जागावाटपाबद्दल अद्याप निर्णय बाकी आहे. याच निर्णयासाठी आज नागपुरात महायुतीतील प्रमुख तीन नेत्यांची बैठक पार पडत आहेत. या बैठकीत २० टक्के जागांबद्दल तडजोड किंवा अदलाबदल याबद्दल चर्चा केली जाणार आहे.

येत्या दोन दिवसात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित?

तसेच दुसरीकडे येत्या २३ सप्टेंबरला गृहमंत्री अमित शाह हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाचं सूत्र अंतिम होण्याची गरज आहे. यामुळे तीन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहेत. सध्या हे तिन्ही नेते विदर्भात आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला येत्या दोन दिवसात निश्चित होणार असल्याचे बोललं जात आहे.