राज्यातील विधानसभा निवडणुकीचं पडघम अखेर वाजलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आता मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक घडामोडी झाल्या. या पाच वर्षात राज्याने तीन बंड पाहिले. तीन मुख्यमंत्री पाहिले. याच काळात आरक्षणासाठी ओबीसी, मराठा, धनगर समाजाने केलेला संघर्षही महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे ओबीसी, मराठा आणि धनगर मतांचं ध्रुवीकरण झालंच. पण या काळात आणखी एका घटकाच्या मतांचं ध्रुवीकरण झालं. ते म्हणजे हिंदू मतांचं. इकडे आरक्षणाचा वाद पेटलेला असतानाच तिकडे भाजप नेते नितेश राणे यांनी मुस्लिम विरोधी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे आपोआपच हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं. त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या पाच वर्षात नितेश राणे यांनी भाजपमध्ये हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतिमा तयार केली आहे. त्यांनी सातत्याने सभेमधून मुस्लिम विरोधी विधानं केलं. हिंदुत्ववादी मोर्चा आणि सभांमध्ये नितेश राणे सातत्याने दिसले. त्यामुळे नितेश राणे यांची प्रतिमा आक्रमक हिंदुत्वादी नेता अशी झाली. हिंदू संघटनांनीही राणे यांचं नेतृत्व स्वीकारल्याचं या पाच वर्षात दिसलं. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने एकत्र राहून काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीला मतदान केलेलं आहे. ही बाब आता मतदानाच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेली आहे. त्यामुळे विधानसभेला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर मुस्लिम मतांवरती अवलंबून राहता येणार नाही ही गोष्ट भाजपाला कळून चुकलेली आहे. त्यामुळेच नितेश राणेंच्या माध्यमातून भाजपने आक्रमक हिंदुत्व मांडलं. त्याचा या निवडणुकीत भाजपला किती फायदा होतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मालेगाव मध्य, छत्रपती संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, भिवंडी पश्चिम, धुळे, भिवंडी पूर्व, मुंब्रा-कळवा, मानखुर्द – शिवाजीनगर, चांदिवली, अणुशक्ती नगर, भायखळा पूर्व, भायखळा पश्चिम, मुंबादेवी, सोलापूर मध्य, मालाड पश्चिम, अकोला पश्चिम, अमरावती आदी मतदारसंघात मुस्लिम समाजाची ताकद आहे. या 17 मतदारसंघात भाजपला फारसा फायदा होणार नाही. मात्र, उर्वरीत जे 271 मतदारसंघ आहेत, त्याची मोट भाजपला बांधायची आहे. त्यामुळेच भाजपने नितेश राणे यांच्या माध्यमातून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा रेटल्याचं जाणकार सांगतात.
राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर दोन पातळ्यांवर काम करून मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न केल्याचं जाणकार सांगतात. एक म्हणजे विकासाच्या कामांना महायुती सरकारने हात घातल्या. लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणून सर्वच घटकातील महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित केलं. लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून विविध वर्गाना आपलसं केलं. उपेक्षित घटकांसाठी महामंडळं सुरू करून त्यांच्यातही आपलं बस्थान बसवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासकामं करणारे मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा जपत होते, दुसरीकडे अजितदादा मुस्लिम आणि दलित मतांची बेगमी करताना दिसत होते तर भाजप नितेश राणेंच्या माध्यमातून आपला सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना दिसत होता. या पातळ्यांवर काम करत भाजपने विधानसभा निवडणुकीची मोट बांधली आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे निकाल लागल्यावरच समजणार आहे.