मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला सातत्याने युतीसाठी गळ का घातली जात आहे, त्याची कारणं दिवसेंदिवस समोर येत आहे. कारण भाजपचा दुसरा गुप्त सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार शिवसेना-भाजप जर लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढले तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी शिवसेना-भाजप युतीने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये शिवसेनेने 18 आणि भाजपने तब्बल 22 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला केवळ 2 तर राष्ट्रवादीला 4 जागा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली होती.
भाजपचा सध्याचा अंतर्गत सर्व्हे
भाजपने नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, शिवसेना-भाजपने युती केल्यास त्यांना 30 ते 34 जागा मिळू शकतात. मात्र जर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप 15 ते 18 आणि शिवसेना केवळ 5 ते 8 जागा जिंकेल. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला 22 ते 28 जागा मिळतील,
असा अंदाज असल्याची माहिती भाजपच्या माजी मंत्र्याने दिली.
म्हणजेच भाजप आणि शिवसेनेला मोठा फटका बसेलच, शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपने राज्यभरात हा सर्व्हे केला.
भाजपच्या माजी मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेसोबत युती करण्याच्यादृष्टीने भाजपला पावलं टाकण्यास बजावलं आहे. शिवसेना-भाजपची युती केली तरच भाजपला 2014 प्रमाणे कामगिरी करता येईल, असं अमित शाहांचं म्हणणं आहे.
युतीसाठी शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अट असू शकते. शिवसेनेने भाजपसमोर कर्नाटचा फॉर्मुला ठेवला आहे. कर्नाटकात काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या, मात्र तरीही जनता दलाचा मुख्यमंत्री स्वीकारला, तोच फॉर्मुला महाराष्ट्रात असावा अशी शिवसेनेची भूमिका आहे, असं भाजप मंत्र्याने सांगितलं.
2014 चं चित्र आणि 2019 चा अंदाज