मुंबई – उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion 2022 Live)होणार असून, एकूण 20 ते 25 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार गरजेचा असल्याने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गट आणि भाजपा (Bjp) यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री (DCM Devendra Fadanvis) यांची एकत्र बैठकही पार पडली असून, हे दोन्ही नेते आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मुंबई- 38 दिवस बेघर झालेला महाराष्ट्र इकडून तिकडून तोडून मंत्रिमंडळ तयार केले जाते आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही ते एकमेकांच्या उरावर उठतील, असेही ते म्हणाले आहेत. हे औट घटकेचं मंत्रिमंडळ असेल, असे आपल्याला वाटत असल्याचे राऊत यांनी सांगितले. बंडखोर आमदारांपैकी 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही विनायक राऊत यांनी केलाय.
मुंबई- उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी केंद्रीय मंत्र्यांना आणि विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, भारती पवार यांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
मुंबई- भाजपाचे संभाव्य मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डिनर डिप्लोमसी. भाजपाचे नेते फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल
औरंगाबाद- अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नाही तर, मंत्रालय किंवा वर्षा निवसस्थानासमोर आत्महत्या करणार, अब्दुल सत्तार समर्थक नदीम पटेल या युवकाने इशारा दिला आहे. सत्तार यांची नाहक बदनामी करण्यात येत असून ती थांबवा, असेही त्याने म्हटले आहे.
मुंबई- भाजपा आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. 18 जणांच्या नावांची यादीही तयार असल्याची माहिती आहे. भाजपाच्या मंत्रिमंडळात काही नव्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या 9 जणांपैकी भाजपाची पाच नावे निश्चित झाली आहेत. तर शिंदे गटातील पाच जणांनाही फोन गेल्याची माहिती आहे.
भाजपाची नावे – चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे
शिंदे गटातील नावे – गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत
सांगली- मिरजचे भाजपाचे आमदार सुरेश खाडे यांनाही मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे. सुरेश खाडे हे फोन आलेले भाजपातील पाचवे नेते आहेत. यापूर्वी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे.
मुंबई- माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. चंद्रकांत पाटील यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे येत्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकांची मोठी जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईत वांद्रे पश्चिमचे आमदार असलेले शेलार यांनी मुंबईत भाजपाला चांगले बळ मिळवून दिलेले आहे. अशा स्थितीत त्यांना आगामी काळात मोठे पद दिले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई- मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या आम्ही वाहिन्यांवर पाहतो आहोत. विस्तार असेल तर आम्हाला निमंत्रण दिले जाते, अद्याप ते निमंत्रण आलेले नाही. उशिरा निमंत्रण येण्याची शक्यता आहे. आज नंदनवनला दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती आहे. उद्या विस्तार होऊ शकतो. उद्या दुपारी कामकाज सल्लागार बैठक बोलवली आहे. म्हणजे अधिवेशन बोलवायचे यासाठी असणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
मुंबई- उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी बातमी आली आहे, आता विस्तार झाल्यावर हे काय दिवे लावणार, ते पाहूयात, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांचे त्यांना लखलाभ असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. निष्ठा विरुद्ध पैसा अशी ही लढाई असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आता आपण मैदानात उतरलो आहे, पळणार नाही, असेही त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले आहे.
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ज्या आमदारांना मंत्रिपदे मिळणार आहेत, त्यांच्यासोबत आज रात्री बैठक होण्याची शक्यता आहे. आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईत ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निरोप संबंधित आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई- सुहास कांदे आणि किशोर पाटील या शिंदे गटाच्या आमंदारांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. सकाळी ९ वाजताच्या बैठकीला त्यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलावण्यात आले आहे. आता या दोघांची वर्णीही मंत्रिपदावर लागते का, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
नांदेड- मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी तु्म्हाला लवकरच कळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये सांगितले आहे. विस्ताराची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आज रात्रीपर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत नावे नक्की केली जातील असे त्यांनी सांगितले.
मुंबई- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याबाबतचे पत्र शिवसेनेकडून विधिमंडळात देण्यात आले आहे. आता महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची काय भूमिका असेल, याकडे अनेकांचे लक्ष असेल. यात पक्षीय बलाबल महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई- उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजभवनाला भेट दिली. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये उद्या सकाळी शपथविधी होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर:- मंत्रिमंडळ विस्तारावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. आता एकदा विस्तार होऊन जाउ द्या , पुढे ढकलू नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे. एकदा मंत्री झालात की लोककल्याणासाठी, अतिवृष्टीग्रस्तांसाठी झटा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. हे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत अधांतरी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई- चिमूरचे भाजपाचे आमदार बंटी भांगडिया यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी झालेल्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई- गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि दादा भुसे यांना शिंदे गटाकडून फोन गेले असल्याची माहिती आहे. शिंदे गटाची उद्या सकाळी 9 वाजता सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे.
मुंबई- भाजपाकडून चार जणांना उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी फोन केले आहेत. त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांचा समावेश आहे.
मुंबई – राज्याचे गृह खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. गृह खाते हे राज्यासाठी महत्त्वाचे खाते आहे. या खात्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता गृहखाते भाजपाकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
मुंबई – उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या मंत्रिमंडळात 60 टक्के नवे चेहरे आणि 40 टक्के अनुभवी नेते या विस्तारात असण्याची शक्यता आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिंदे गटाच्या यादीत गुलाबराव पाटील यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे.
अमरावती -राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अतिशय बेजबाबदारपणे वागत असून राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही. यामुळे राज्यातील महिला व मुलांवर अत्याचार वाढत आहेत. या वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार असून महाराष्ट्राला बेवारस करून दोघांची दिल्लीवारी सुरू असल्याचा जोरदार टोला काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला आहे.भंडारा, पुणे यासह राज्यात ठिकठिकाणी महिला व मुलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, बहुमत असल्याचा कांगावा करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांचं सरकार बनवून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे काम केलं आहे. राज्याचा कारभार सचिवांच्या हाती सोपवून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्लीत मग्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.
जळगाव – आदित्य ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे आदित्य ठाकरे हे उद्या जळगाव जिल्ह्यात संपर्क यात्रेसाठी येणार होते. जिल्ह्यातील पाचोरा, धरणगाव आणि पारोळा मतदार संघात त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या मात्र आता त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोआहे याच पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाला की काय, अशीही चर्चा सुरू आहे
शिर्डी – भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिर्डीत साईदर्शन घेऊन विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे सरकारमध्ये भाजपाच्या कोट्यातून विखेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. भाजपात प्रवेश केलेल्या विखे पाटलांना कोणते मंत्रिपद मिळणार याकडेही सगळ्यांचे लक्ष असेल. साईबाबा जी जबाबदारी देतील ती पार पाडणार, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शिर्डी विमानतळावरून विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत.
– आपली ताकत वाढली आहे.
– नाशिक मध्ये 1 लाखापेक्षा अधिक सदस्य नोंद झाली पाहिजे..
– माझा भरवसा तुमच्या वर आहेत..
– एकनाथ शिंदे गटाने सदस्य नोंदणीसाठी प्रोफेशनल अजेंट लावले आहेत…
– सदस्य संख्या ते जेवढी करत आहेत त्याच्या दसपटीने मला हवी आहे..
– केवळ गर्दी,फोटो नको..
– फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील..
– त्यांच्या एजन्सी काम करत आहेत..
– मी कोणालाही कमी लेखत नाही.. आपल्याला जिंकायचे आहे..मर्दासारखे जिंकायचे आहे..
– प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नांदी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे..
– सगळ्यांना वेळेवर जबाबदारी नक्की देईल..
– शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकवू देऊ नका..
– भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला त्याला दाखवून द्या..
जळगाव – युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात ठाकरे गटाला धक्का बसला आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटाला पाठिंबा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटाचा प्रवेश सोहळा पार पडला. आमदार किशोर पाटलांनी नव्याने जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखपदाच्या नियुक्त्याही केल्या आहेत.
मुंबई – अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे नाव टीईटी घोटाळा प्रकरणात आल्यानंतर, आता मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
मुंबई- राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असून, उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे गट आणि भाजपा यांच्या 12 मंत्र्यांचा शपथविधी उद्या राजभवनात होणार असल्याची माहिती आहे. याबाबत नंदनवन येथे शिंदे आणि फडणवीस यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजभवनावर जाून राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
मुंबई – उद्या सकाळी ११ वाजता विधान भवन किंवा राजभवन इथे कॅबिनेट विस्तार होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी पाच वाजता आमदारांना सीएमओ ऑफिसमधून फोन जाणार आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 20 ते 25 मंत्र्यांचा छोटेखानी शपथ विधी होणार असल्याची माहीती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये दोन तासांपासून चर्चा सुरु असून, यादी निश्चित करण्यात येत असल्याची माहिती आहे. या यादीत काही फेरबदलही करण्यात येत आहेत.