मोठी बातमी | मंत्रिमंडळ विस्तार कधी? शिंदे गटाच्या आमदाराने दिली महत्त्वाची माहिती!

| Updated on: Nov 22, 2022 | 9:39 AM

येत्या 10 ते 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तारासाठीची प्रतीक्षा संपणार, हे निश्चित दिसतंय.

मोठी बातमी | मंत्रिमंडळ विस्तार कधी? शिंदे गटाच्या आमदाराने दिली महत्त्वाची माहिती!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः राज्याला बहुप्रतिक्षीत अशा मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) कधी होईल, याचं उत्तर मिळालंय. हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Assembly session) मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे. त्यानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल, असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलंय. एकनाथ शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांपैकी अनेक इच्छुक कॅबिनेटच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता वारंवार दिसून येतेय. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांचंही मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. कारण या विस्तारानंतर महायुतीमध्ये फूट पडणार, शिंदे गटातील अनेक अस्वस्थ आमदार पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहेत. तर काही शिवसेना नेत्यांनी 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असाही दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा होण्यासही बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल, असं आशिष जैस्वाल म्हणाले आहेत.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली. बच्चू कडू यांनी तर मोठं शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रिपद मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

येत्या 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच हिवाळी अधिवेशन नागपुरात झाली. मात्र महाविकास आघाडी सरकार याला अपवाद ठरलं. कोरोना संकटामुळे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे अधिवेशन नागपुरात होऊ शकलं नाही. जवळपास दोन वर्षांच्या गॅपनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे.

एकूणच, येत्या 10 ते 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तारासाठीची प्रतीक्षा संपणार, हे निश्चित दिसतंय.