Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्ताराचं अद्याप निमंत्रण नाही, पण हालचाली पाहता उद्या विस्ताराची शक्यता, अजितदादांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 08, 2022 | 5:12 PM

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही असं म्हटलंय. मात्र, उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीबाबत फोन आल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.

Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्ताराचं अद्याप निमंत्रण नाही, पण हालचाली पाहता उद्या विस्ताराची शक्यता, अजितदादांची प्रतिक्रिया
अजित पवार, विरोधी पक्षनेते
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राज्यात शिंदे सरकारच्या (Shinde Government) स्थापनेला महिला उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागत नव्हता. मात्र, आता उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची माहिती मिळतेय. भाजप आणि शिंदे गटाकडून काही आमदारांना फोन गेले आहेत. तसंच त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही असं म्हटलंय. मात्र, उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीबाबत फोन आल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.

अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप काही फोन आलेला नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिल्ली ट्रिप झाली आहे. तसंच आज नंदनवनमध्येही शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली आहे. त्यांच्या काही सहकाऱ्यांना फोन गेल्याची आणि त्यांना मुंबईला बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. पण विस्तार असेल तर आम्हाला फोन येतो. तसा फोन किंवा पत्र अद्याप आलं नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

अब्दुल सत्तारांवरील आरोपांवर अजितदादांची प्रतिक्रिया

शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी परीक्षेबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरही अजितदादांनी प्रतिक्रिया दिलीय. मी बातमी वाचली. पण सत्तार म्हणाले हे आरोप खोटे आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. नक्की सत्तार म्हणतात ते खरं की बातमी खरी? काही चुकीचं झालं असेल तर चौकशी झाली पाहिजे, असं अजितदादा म्हणाले.

भाजप आणि शिंदे गटाकडून आमदारांना फोन

भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. भाजप पक्षश्रेष्ठींचा या आमदारांना फोन गेला आणि त्यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या आमदारांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडूनही गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे आणि संदीपान भुमरे यांना फोन गेले आहेत. त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलं असून शासकीय निवासस्थानीच थांबण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

रात्री किंवा उद्यापर्यंत नावं निश्चित होणार- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून नांदेड दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाची नावं अद्याप निश्चित झाली नाहीत. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत नावं नक्की होतील, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.