मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजे 16 जून रोजी आहे. सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांचा समावेश असला, तरी काही जणांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चिन्हं आहेत.
मंत्रिमंडळातील 3 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईचे एक आणि विदर्भातील 2 मंत्र्यांचा समावेश आहे. मुंबईतील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद धोक्यात आहे. तर विदर्भातील पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव राजे सत्यवानराव आत्राम यांच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता आहे.
प्रकाश मेहता यांच्यावर घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश मेहतांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे.
रिपाईंला मंत्रिपद
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईलाही मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंकडून अविनाश महातेकर यांचे नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे.
शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटर तर पंढरपूरचे आमदार तानाजी सावंत यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. तसं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं.