तुम्ही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहात. तयार राहा, तुमचं अभिनंदन… असे फोन भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना जायला सुरुवात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. भाजपकडून आज सकाळी सकाळीच पहिला फोन नितेश राणे यांना गेला आहे. त्यामुळे नितेश राणे हे राज्यात पहिल्यांदाच मंत्री होणार असल्याचं दिसत आहे. आज दुपारी नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यावेळी एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नागपुरात आज दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी 30 ते 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे कालच सर्व आमदार नागपुरात आले आहेत. प्रत्येक आमदार मंत्रिपदासाठी फोन केव्हा येतोय याची वाट पाहत आहे. रात्रीच या इच्छुकांना फोन येणार असल्याचं सांगितलं जात होतं. अजितदादा गटाकडून काही लोकांना रात्री फोन गेलेही. पण भाजप आणि शिंदे गटाकडून काही कुणाला फोन गेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये चांगलीच धाकधूक पसरली होती.
मात्र, आज सकाळपासूनच भाजपने इच्छुक आमदारांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशा लोकांना फोन केला आहे. बावनकुळे यांनी नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केला आहे. त्यामुळे कोकणात मंत्रिपद जाणार असल्याच स्पष्ट झालं आहे.
पंकजा मुंडे यांनाही मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं फडणवीस सरकारमध्ये कमबॅक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही भाजपकडून मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. जयकुमार रावल आणि पंकज भोयर हे पहिल्यांदाच मंत्री होणार आहे. भाजपने जातीय आणि प्रादेशिक समीकरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपकडून केवळ 18 लोकांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याने फडणवीस यांनी सरकारमध्ये नवीन चेहऱ्यांना घेण्यावर भर दिल्याचं सांगितलं जात आहे.
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
माधुरी मिसाळ
अतुल सावे